कोलकाता भिडणार पंजाबला

42

सामना ऑनलाईन, कोलकाता

दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्ससमोर उद्या ईडन गार्डन्सवर होणाऱ्या आयपीएल लढतीत यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असणार आहे. सलामीच्या लढतीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्सकडून हार सहन करावी लागली होती. किंग्ज इलेव्हन पंजाबने मात्र पहिल्या दोन्ही लढतींत विजय मिळवून यंदाच्या मोसमाची सुरुवात दणक्यात केली आहे. बघूया गौतम गंभीरची कोलकाता नाइट रायडर्स उद्या ग्लेन मॅक्सवेलच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा कसा सामना करतेय ती…

ख्रिस लीनला दुखापत
सलामीच्या लढतीत दिमाखदार विजय मिळवणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला उद्या होणाऱ्या लढतीआधी मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर व आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जाणारा ख्रिस लीन हा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत जखमी झालाय. त्यामुळे त्याच्याऐवजी रॉबिन उत्थप्पाला संघामध्ये संधी देण्यात येईल अशी शक्यता नाकारता येत नाही.

मॅक्सवेलची कॅप्टनशिप जोरात
ग्लेन मॅक्सवेलच्या कर्णधारपदात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ दमदार कामगिरी करतोय. इऑन मॉर्गन व डॅरेन सॅमी संघात असूनही त्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. या संधीचा तो फायदा घेतोय. संधीचे सोने करतोय. आता उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळाडूंना कसा हाताळतोय हेही पाहणे रंजक ठरणार आहे.

उमेश यादवमुळे आत्मविश्वास उंचावणार
हिंदुस्थानी क्रिकेट संघाने या मोसमात घवघवीत यश संपादन केले आहे. या जबरदस्त यशामध्ये रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा या फिरकी गोलंदाजांसोबतच वेगवान गोलंदाज उमेश यादव याचाही सिंहाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काही लढतींमध्ये विश्रांती घेणारा विदर्भचा वेगवान गोलंदाज आता उद्या होणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असेल.

आपली प्रतिक्रिया द्या