‘बीसीसीआय’कडून ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींना चौपट बोनस

18

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

‘आयपीएल’च्या ‘रन’धुमाळीला प्रारंभ होण्यापूर्वीच संघ मालकांसाठी म्हणजेच फ्रेंचाईजींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘बीसीसीआय’ दरवर्षी ‘आयपीएल’च्या फ्रेंचाईजींना एक ठरावीक रक्कम देत असते, मात्र या वर्षी ‘बीसीसीआय’ने या रकमेत तब्बल चौपट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ‘आयपीएल’चे दहा सत्र झाले. या दहा सत्रांमध्ये ‘बीसीसीआय’ फ्रेंचाईजींना प्रत्येक वर्षासाठी ६० कोटी रुपये देत होती. पण या वर्षी या रकमेत ‘बीसीसीआय’ने भरघोस वाढ केली आहे. आता नव्या वाढीनुसार ‘आयपीएल’ फ्रेंचाईजींना प्रत्येकी २५० कोटी रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळणार आहे.

‘आयपीएल’ला लक्ष्मीचा वरदहस्त

‘आयपीएल’ म्हणजे लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेला टी-२० क्रिकेटचा मेगाइव्हेंट होय. बीसीसीआय ‘आयपीएल’च्या फ्रेंचाईजींना एवढी मोठी रक्कम देत असेल तर त्यांच्या तिजोरीत येणारी गंगाजळी किती असेल असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला असेल. ‘बीसीसीआय’ने प्रसारण हक्कांसाठी स्टार इंडियाबरोबर १६,३४७ कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार ‘बीसीसीआय’ला प्रत्येक मोसमासाठी ३,२०० कोटी रुपये मिळणार आहेत. आयपीएलचे मुख्य प्रायोजक असलेल्या व्हिवो या कंपनीकडूनही ‘बीसीसीआय’ला २,१९९ कोटी रुपये मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या