चेन्नईच्या विजयाचा चौकार, रोमहर्षक सामन्यात हैदराबादचा पराभव

18

सामना ऑनलाईन । हैदराबाद

शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा ताणलेल्या रोमहर्षक झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ४ धावांनी पराभव करत विजयी चौकार लगावला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन आणि युसूफ पठाणने विजयासाठी नेटाचा प्रयत्न केला. विलियम्सनने ५१ चेंडूत ८४ आणि पठाणने २७ चेंडूत ४५ धावा केल्या. परंतु धाव आणि चेंडूमधील अंतर कमी करण्यात ते अपयशी ठरले आणि हैदराबादला आयपीएलमधील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

राशिदने बदडले
विलियम्सन आणि पठाण बाद झाल्यानंतर चेन्नईने सुटकेचा श्वास सोडला पण राशिद नावाचा शनि त्यांच्या मानगुटीवर कधी बसला हेच कळाले नाही. राशिदने फक्त ४ चेंडूत १७ धावा करत चेन्नईची हवा टाईट करून टाकली. राशिदने दोन षटकार आणि एक चौकार लगावत सामना हैदराबादच्या बाजून झुकवला परंतु शेवटच्या चेंडूवर ६ धावांची आवश्यकता असताना ब्राव्होने अप्रतिम चेंडू टाकत राशिदला मोठा फटका मारण्यापासून रोखले आणि चेन्नईने विजयी जल्लोष केला.

त्याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद संघात झालेल्या सामन्यात रायडू आणि रैनाच्या फटकेबाजीनंतर धोनीने गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ३ बाद १८२ धावा केल्या होत्या. रायडूने ३७ चेंडूत ७९, सुरेश रैनाने ४३ चेंडूत ५४ आणि धोनीने १२ चेंडूत २५ धावांची खेळी केल्या.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला पन्नास धावांच्या आत दोन तगडे झटके बसले. गेल्या सामन्यातील शतकवीर शेन वॉटसन ९ आणि यंदाच्या आयपीएलमधील पहिला सामना खेळणारा डू प्लेसिस ११ धावा काढून बाद झाले. वॉटसनला भुवनेश्वरने ते डू प्लेसिसला राशिद खानने बाद केले.

जोडी जमली रे…
दोन गडी झटपट गमावल्यानंतर सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांनी आधी सावध खेळ केला. जम बसल्यानंतर दोघांनीही हैदराबादच्या भक्कम गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. रैनापेक्षा रायडू चांगलाच फॉर्मात होता. परंतु एका धावेच्या मोहापायी त्याने आपला बळी गमवला. बाद होण्यापूर्वी दोघांमध्ये ९ षटकात ११२ धावांची भागिदारी करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.

रैनाची बॅक टू बॅक खेळी
दुखापतीमुळे दोन सामने मुकलेल्या रैनाने कमबॅकनंतर दमदार पुनरागमन केले आहे. राजस्थानविरुद्ध रैनाने २९ चेंडूत ४६ आणि रविवारी बेंगळुरुविरुद्ध ४३ चेंडूत ५४ धावांची खेळी केल्याने चेन्नईला फलंदाजीत मोठा दिलासा मिळाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या