वय नव्हे, फिटनेस महत्त्वाचा!

68

सामना ऑनलाईन, मुंबई

दोन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेनंतर ‘आयपीएल’च्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत पुनरागमन करणाऱया महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला वयस्क खेळाडूंचा संघ म्हणून हिणवले गेले होते. मात्र, जबरदस्त भट्टी जमलेल्या या संघाने तिसऱयांदा ‘आयपीएल’च्या झळाळत्या करंडकावर रुबाबात नाव कोरून टीकाकारांचे दात घशात घातले. जेतेपदाला मिठी मारल्यानंतर ‘वय नव्हे, तर फिटनेस महत्त्वाचा असतो,’ असा टोला धोनीने लगावला.

किताबी लढतीत सनरायझर्स हैदराबादवर ८ गडी राखून विजय मिळविल्यानंतर धोनीला चेन्नई संघातील वयस्क खेळाडूंबद्दल सवाल केला. त्यावर बोलताना धोनी म्हणाला, वय हा केवळ एक आकडा होय. खेळाडू किती फिट आहे ही बाब अधिक महत्त्वाची असते. कर्णधाराला आपल्या संघात चपळ आणि फिट खेळाडू हवे असतात. अंबाती रायडू ३३ वर्षांचा आहे, पण तो शंभर टक्के फिट आहे. अष्टपैलू शेन वॉटसन संघातील महत्त्वाचा खेळाडू होता. त्यामुळे आम्ही त्याला क्षेत्ररक्षण करताना रिक्स न घेण्याचा सल्ला दिला होता. प्रत्येकाला आपापली जबाबदारी माहिती होती. हैदराबादकडे भुवनेश्वर कुमार आणि राशिद खान हे प्रतिभावान गोलंदाज होते. त्यानुसारच आम्ही फलंदाजीची रणनीती आखली होती. फलंदाजी चांगली झाल्याने विजेतेपदाच्या लढतीत जास्त संघर्ष करावा लागला नाही, असेही धोनीने म्हटले.

वॉटसनने विजय हिरावून नेला!

खरं तर आमची १७८ ही आव्हानात्मक धावसंख्या होती. कारण गोलंदाजी ही हैदराबादची मुख्य ताकद होती. मात्र, शेन वॉटसनने विजय हिरावून नेला. अंतिम लढतीतील पराभव नक्कीच बोचणारा असतो. मात्र, चेन्नईने ज्या पद्धतीने खेळ केला, ते बघता धोनीचा संघ जेतेपदाचा हक्कदार होता. त्यांना जेतेपदाचे श्रेय द्यायलाच हवे- केन विल्यम्सन (कर्णधार, सनरायझर्स हैदराबाद)

पंतला २० लाख; धोनीला १० लाख,‘आयपीएल’मधील सर्वोत्तम खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव

तब्बल ५६ दिवस… ६० सामने… शेवटच्या सामन्यापर्यंत रंगलेला प्ले ऑफचा सस्पेन्स… आणि क्रिकेटशौकिनांचा उदंड प्रतिसाद… अशा रंगतदार ‘आयपीएल’ टी-२० क्रिकेटच्या मेगा इव्हेंटची रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर सांगता झाली. चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला झळाळत्या करंडकासह २० कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेता सनरायझर्स हैदराबाद संघही १२.५ कोटी रुपयांच्या बक्षिसाचा मानकरी ठरला. याचबरोबर स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱया क्रिकेटपटूंवरही ‘बीसीसीआय’ने बक्षिषांचा धनवर्षाव केला.

  •  ऑरेंज कॅप – केन विल्यम्सन (७३५ धावा), कर्णधार सनरायझर्स हैदराबाद (१० लाख रुपये व ट्रॉफी).
  •  पर्पल कॅप – ऍण्ड्रय़ू टाय (२४ बळी), किंग्ज इलेव्हन पंजाब (१० लाख रुपये व ट्रॉफी).
  •  स्टार प्लस इनोवेटिव आयडिया – महेंद्रसिंग धोनी, कर्णधार चेन्नई सुपरकिंग्ज (१० लाख व ट्रॉफी).
  •  मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर – सुनील नरीन, कोलकाता नाइट रायडर्स (१० लाख रुपये व ट्रॉफी).
  •  एमर्जिंग प्लेअर – रिषभ पंत, दिल्ली डेअरडेविल्स (१० लाख रुपये व ट्रॉफी).
  •  आयपीएल प्लेअर प्ले – मुंबई इंडियन्स (ट्रॉफी).
  •  परफेक्ट कॅच ऑफ द सीजन – ट्रेंट बोल्ट, दिल्ली डेअरडेविल्स (१० लाख रुपये व ट्रॉफी).
  •  सुपर स्टाइकर ऑफ द सीजन – सुनील नरीन, कोलकाता नाइट रायडर्स (टाटा नेक्सॉन कार).
  •  स्टाइलिश प्लेअर ऑफ द सीजन – रिषभ पंत, दिल्ली डेअरडेविल्स (१० लाख रुपये व ट्रॉफी).
आपली प्रतिक्रिया द्या