… आणि भर मैदानात कुलदीप यादव ढसा ढसा रडला

सामना ऑनलाईन । कोलकाता

आयपीएलच्या 12 व्या मोसमाची रंगत वाढत आहे. शुक्रवारी इडन गार्डन्सच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात एक विचित्र प्रसंग घडला. कोलकाताचा फिरकीपटू कुलदीप यादव ढसा ढसा रडला.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकी आणि मोईन अलीच्या तुफानी अर्धशतकीय खेळीच्या बळावर बंगळुरूने 213 धावांचा डोंगर रचला. आरसीबीने शेवटच्या 10 षटकांमध्ये 143 धावांची लूट केली. विराटसह मोईन अलीने फक्त 28 चेंडूत 66 धावांची वादळी खेळी केली. या दरम्यान मोईनने कोलकाताचा फिरकीपटू कुलदीप यादवची धुलाई केली. मोईनने कुलदीपच्या एकाच षटकात 3 षटकार आणि दोन चौकारांसह 27 धावा चोपल्या.

बंगळुरूच्या डावातील 16 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोईनने चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. मोईनने 4, 6, 4, 6, एक वाईड आणि 6 अशा एकूण 27 धावा चोपल्या. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर कुलदीपने मोईनला बाद केले. मोईन बाद झाल्यानंतर कोलकाताने ‘टाईम आऊट’ घेतला. कुलदीपने मोईनचा बळी घेतला असला तरी सर्वाधिक धावा चोपल्याने पंचाकडून कॅप घेऊन त्याने मैदानावर फेकून दिली. या दरम्यान त्याच्या डोळ्यात पाणी तराळले. कुलदीपची सांत्वन करण्यासाठी प्रसिद्ध कृष्णने धाव घेतली तसेच आंद्रे रसेलनेही कुलदीपला चुचकारत शांत करण्याचा प्रयत्न केला.