बंगळुरूसाठी ‘जिंकू किंवा मरू’, पंजाबला वेध सहाव्या विजयाचे

सामना ऑनलाईन, बंगळुरू

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मागील दोन लढतींत विजय मिळवत आयपीएलमधील आपले आव्हान कायम राखले असले तरी यापुढील सर्व लढतींत त्यांना विजय आवश्यक आहे. आता उद्या त्यांच्यासमोर रविचंद्रन अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे आव्हान असणार आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी या लढतीत विजय हवाच आहे. यावेळी किंग्ज इलेव्हन पंजाबला सहाव्या विजयाचे वेध लागले असतील. त्यांच्यासाठीही पुढील सर्व लढतींचा निकाल महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 10 सामन्यांमधून फक्त तीन सामन्यांमध्येच विजय संपादन करता आला आहे. कर्णधार विराट कोहली, ए. बी. डिव्हिलीयर्स, पार्थिव पटेल यांच्या बॅटमधून धावा निघाल्या असल्या तरी गोलंदाजी विभागात त्यांना मार खावा लागत आहे. अनुभवी गोलंदाज डेल स्टेनचे पुनरागमन त्यांच्यासाठी आनंददायी ठरले आहे. मात्र त्याच्या गोलंदाजीवरही हल्लाबोल करण्यात आलाय. त्यामुळे उद्या सर्वच बाबतीत विराट ब्रिगेडला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.

आजची आयपीएल लढत

  • किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • बंगळुरू, रात्री 8 वाजता
  • स्टार खेळाडूंची कामगिरी ठरणार निर्णायक

रविचंद्रन अश्विनच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आतापर्यंत दहा सामन्यांमधून पाच सामन्यांमध्ये विजय मिळवले आहेत. उद्याच्या लढतीत या संघातील स्टार खेळाडूंना आपली चमक दाखवावी लागणार आहे. ख्रिस गेल, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, डेव्हिड मिलर, मयांक अग्रवाल या खेळाडूंना दमदार कामगिरी करून प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकावा लागणार आहे. अन्यथा आणखी एका पराभवामुळे त्यांचा आत्मविश्वास खालावेल एवढे मात्र नक्की.