#IPL2019 रहाणेला कर्णधारपदावरून हटवले, राजस्थानची धुरा स्मिथच्या खांद्यावर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयपीएलच्या 12 व्या मोसमासाठी आगामी सामन्यात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपदाची धुरा काढून ती स्मिथकडे देण्यात आलेली आहे. शनिवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यात रहाणेऐवजी स्मिथ नाणेफेकीसाठी मैदानावर आला.

रहाणेला कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याची माहिती राजस्थान रॉयल्सने शनिवारी मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी दिली. कर्णधारपद काढून घेतले असले तरी रहाणे संघातील प्रमुख खेळाडू असेल. रहाणेकडून नेतृत्वाची धुरा काढून ती स्मिथकडे देण्यात आली आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानने पहिले सात सामने खेळले आहेत. यात राजस्थानने फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान उर्वरित सामने स्थिमच्या नेतृत्वाखाली खेळेल.

राजस्थान रॉयल्सचे प्रमुख जुबिन भरुचा यांनी सांगितले की, अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्सच्या संघात कायम राहणार आहे. 2018 मध्ये रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. रहाणे आमच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू असेल आणि आगामी काळात स्मिथला गरज असेल तेव्हा तो मार्गदर्शन करेल. स्थिम क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वोत्तम कर्णधार आहे आणि राजस्थानला विजयाचे द्वार पुन्हा एकदा खोलून देईल असा आमचा ठाम विश्वास आहे.