लॉकडाऊन वाढल्याने यंदा ‘IPL’ ला विसरा, सौरव गांगुलीने दिले संकेत

565

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा मंगळवारी केली. याआधी मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता आणि त्याची मुदत आज 14 एप्रिलला संपणार होती. मात्र गेल्या काही दिवसात देशात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन आणखी 19 दिवस वाढण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम होण्याची शक्यता मावळली आहे. याआधी परिस्थिती पाहून 15 एप्रिल पासून आयपीएल खेळवण्यात येणार होते, मात्र आता आयपीएल होण्याची शक्यता कमी असून बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही याबाबत संकेत दिले आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआयच्या सूत्रांनी आयपीएल पुन्हा एकदा पुढे।ढकलण्यात आल्याचे सांगितले. मात्र यावेळी तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. यामागे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक आणि हिंदुस्थानमधील वातावरण यांची महत्वाची भूमिका आहे. कारण सद्यपरिस्थितीत आयपीएल डिसेंबर पूर्वी खेळवणे अशक्य आहे. कारण जुने ते सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यामुळे या काळात सामने ठेवणे अशक्य आहे. 18 ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकप सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत वर्ल्डकप चालेल. यानंतर देखील आयसीसीच्या वेळापत्रकानुसार मालिका आहेत. त्यामुळे डिसेंबर पूर्वी आयपीएल आयोजित करणे सध्या तरी अशक्य वाटत आहे.

आयपीएलला विसरा
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत बोलताना म्हंटले की, आम्ही सद्यपरिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सध्या काहीही स्पष्ट बोलू शकत नाही. आता काहीच पर्याय दिसत नाहीये. विमानतळ बंद आहेत, लोकांना घरात थांबणे गरजेचे आहे, सर्व कार्यालय बंद आहेत. कोणीही कुठे जाऊ शकत नहू. अशी परिस्थिती पुढील महिन्यापर्यंत राहू शकते. अशा स्थितीत खेळाडूंना कुठे नेता-आणताही येणार नाही. सध्या जगभरातील कोणतायही खेळासाठी ही परिस्थिती अनुकूल नाही. त्यामुळे आयपीएलही विसरा.

परिस्थिती भीतीदायक
तो पुढे म्हणाला, सध्या परिस्थिती भीतीदायक आहे. मी 46 वर्षात अशी परिस्थिती कधीही पाहिली नाही आणि पुढेही पहायची इच्छा नाही. सध्या जगभरातील लोक फक्त किती मृत्यू होत आहेत याचे आकडे मोजत आहेत आणि हे भयानक आहे.

…तर 3 हजार कोटींचे नुकसान
आयपीएल अद्याप रद्द करण्याचा निर्णय झालेला नाही. अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु जर आयपीएल रद्द झाले तर जवळपास 3 हजार कोटींचे नुकसान होईल असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. यात बीसीसीआय, स्पोर्ट चॅनेल, संघ मालक आणि खेळाडू यांच्याही नुकसानीचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या