IPL 2020 – आता विजयाला पर्याय नाही! चेन्नई-राजस्थानमध्ये आज ‘करो या मरो’ लढत

दोन गतविजेत्या संघांमध्ये आज आयपीएलमध्ये लढत रंगणार आहे. यावेळी महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ स्टीव्हन स्मिथच्या राजस्थान रॉयल्सशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत झालेल्या नऊ लढतींमधून फक्त तीनमध्येच विजय मिळवलेत. सहा लढतींमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय. आता दोन्ही संघांना उर्वरित पाच लढतींमध्ये विजयाची नितांत गरज आहे. यापुढील लढतींमध्ये विजयाला पर्याय नाही हेही दोन्ही संघांना माहीत असेल. त्यामुळे आता सोमवारी अबुधाबी येथे होणाऱया ‘करो या मरो’ लढतीत कोणता संघ बाजी मारतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

राजस्थान रॉयल्ससाठी या मोसमात दोन खेळाडूंनी चांगली कामगिरी केलीय. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर व अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतिया ही त्यांची नावे. राहुल तेवतियाने 222 धावा फटकवल्या असून सहा फलंदाजही बाद केले आहेत. एवढेच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही त्याने उत्पृष्ट कामगिरी बजावली आहे. इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर याने 12 फलंदाजांना बाद करीत आपली चुणूक दाखवलीय. त्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.

संजू सॅमसनचे अपयश

राजस्थान रॉयल्सला मागील लढतीत ए. बी. डिव्हिलियर्सच्या झंझावातापुढे नतमस्तक व्हावे लागले, पण या लढतीत राजस्थान रॉयल्ससाठी एक महत्त्वाची गोष्ट घडली. सलामीला पाठवलेल्या रॉबिन उथप्पाने चमकदार खेळी केली. तसेच कर्णधार स्टीव्हन स्मिथनेही अर्धशतक झळकवत आपण फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले, पण तरीही या संघाला फलंदाजीत आणखी सुधारणा करता येणार आहे. संजू सॅमसनचे अपयश खटकणारे आहे.

ब्राव्होची दुखापत, टेन्शन वाढले

महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपरकिंग्सचा संघ यंदा आपला ठसा उमटवण्यात अपयशी ठरतोय. संघातील बहुतांशी क्रिकेटपटूंचे वय जास्त असल्यामुळे थकलेला वयस्करांचा संघ म्हणून टीका केली जात आहे. यामध्ये भरीस भर म्हणजे ड्वेन ब्राव्हो या अष्टपैलू खेळाडूला झालेल्या दुखापतीमुळे चेन्नई सुपरकिंग्सचे टेन्शन आणखी वाढले आहे. दोन आठवडे तो खेळू शकणार नाही अशी माहिती प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडून देण्यात आली.

  • आजची लढत: चेन्नई सुपरकिंग्स – राजस्थान रॉयल्स झायेद (क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या