राजस्थानचे लक्ष्य सलग दुसऱ्य़ा विजयाचे, पंजाबचा संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्यासाठी सज्ज

शानदार फॉर्ममध्ये असलेल्या दोन संघांमध्ये उद्या आयपीएलची लढत रंगणार आहे. एकीकडे विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला धूळ चारल्यानंतर कमालीचा विश्वास संपादन करणारा किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल, तर दुसरीकडे सलामीच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा धुव्वा उडवत विजयी सलामी देणारा राजस्थान रॉयल्सचा संघ सलग दुसऱ्य़ा लढतीत ‘जय’ मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. या दोन संघांमध्ये होणारी लढत जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी ‘संडे धमाका’ ठरू शकतो.

पूरण, मॅक्सवेलला खेळ उंचवावा लागेल

किंग्स इलेव्हन पंजाबसाठी मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, शेल्डन कॉटरेल यांनी गोलंदाजीत प्रभावी कामगिरी केलीय. त्यामुळे कोच अनिल कुंबळे व कर्णधार लोकेश राहुल यांना गोलंदाजी विभागाचे टेन्शन नसेल, पण निकोलस पूरण व ग्लेन मॅक्सवेल या परदेशी क्रिकेटपटूंना फलंदाजीत अद्याप ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे दोघांनाही आपला खेळ उंचवावा लागणार आहे. ख्रिस गेलला केव्हा संधी देण्यात येते याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

दोन्ही कर्णधार फॉर्ममध्ये

किंग्स इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे कर्णधार दमदार फॉर्ममध्ये आहेत. याचा फायदा दोन्ही संघांना होऊ शकतो. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीवन स्मिथ याने सलामीच्या लढतीत 69 धावा फटकावत विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलच्या नाबाद 132 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या झंझावातात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पालापाचोळा झाला. याप्रसंगी दोन्ही कर्णधार आपला फॉर्म कायम राखत आपापल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का हे पाहायला आवडेल.

इतरांनाही जबाबदारी

घ्यावी लागेल

स्टीवन स्मिथ व संजू सॅमसन यांची दमदार फलंदाजी व जोफ्रा आर्चर याच्या जबरदस्त अष्टपैलू खेळाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सलामीच्या लढतीत विजय मिळवलाय, पण आगामी लढतींमध्ये सर्वांनाच जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. यशस्वी जैसवाल, डेव्हिड मिलर, रॉबिन उथप्पा, टॉम करण यांनाही आपली चमक दाखवावी लागणार आहे. अर्थात राजस्थान रॉयल्स आतापर्यंत फक्त एकच लढत खेळला आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीबाबत बोलणे योग्य ठरणार नाही.

आजची लढत

राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब

शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह

रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या