IPL 2020 – दिल्ली प्ले ऑफ गाठणार की हैदराबाद आव्हान राखणार

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत उद्या (दि. 27) दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात महत्त्वपूर्ण लढत रंगणार आहे. दिल्लीला ही लढत जिंकून प्ले ऑफ गाठण्याचा पहिला मान मिळविण्याची संधी असेल, तर दुसरीकडे जर-तरच्या समीकरणावर स्पर्धेतील आव्हान राखण्यासाठी हैदराबादलाही जिंकावेच लागणार आहे.

प्ले ऑफ गाठून निश्चिंत होण्यासाठी श्रेयस अय्यरच्या दिल्ली संघाला मागील दोन लढतींत पराभव पत्करावा लागला. तरीही हा संघ गुणतालिकेत 14 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. दिल्लीच्या अजून 3 लढती शिल्लक असल्या तरी हैदराबादला हरवून प्ले ऑफची फेरी निश्चित करून निश्चिंत होण्याच्या इराद्याने ते मैदानावर उतरतील.

दिल्लीकडे आक्रमक फलंदाजांची फळी, विविधतेने नटलेला गोलंदाजीचा ताफा आहे. त्यामुळे हा संघ कोण्या एका खेळाडूवर अवलंबून नाही. मात्र, मागील 3 लढतींत शिखर धवन वगळता इतर फलंदाजांनी निराशा केलेली आहे. शिखरने चेन्नई व पंजाबविरुद्ध लागोपाठ शतके ठोकलेली आहे. त्यामुळे या सलामीवीराला रोखण्याचे आव्हान हैदराबादच्या गोलंदाजांपुढे असेल. हैदराबादकडे जेसन होल्डर, संदीप शर्मा, खलील अहमद, टी. नटराजन यांच्यासह मॅचविनर राशिद खान असा गोलंदाजी ताफा आहे. मात्र, दिल्लीच्या खोलवर फलंदाजीला रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असेल.

उभय संघ

दिल्ली कॅपिटल्स

शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, मार्पस स्टोइनिस, शिमरन हेटमायर, आर. अश्विन, इनरिच नॉर्जे, अक्षर पटेल, कॅगिसो रबाडा.

सनरायजर्स हैदराबाद

डेविड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, जेसन होल्डर, प्रियम गर्ग, विजय शंकर, राशिद खान, संदीप शर्मा, खलील अहमद, टी. नटराजन, शाहबाज नदीम.

आता जिंकावेच लागेल

हैदराबादला मागील लढतीत पंजाबविरुद्ध 127 धावांचे माफक आव्हानाचाही पाठलाग करता आला नव्हता. हा मानहानिकारक पराभव विसरून उद्या डेव्हिड वॉर्नरच्या सेनेला मैदानात उतरावे लागणार आहे. 8 गुणांसह हा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर असल्याने त्यांना आता उर्वरित 3 लढती जिंकाव्याच लागतील.

हैदराबादची फलंदाजी वॉर्नर, जॉनी बेयरस्टॉ व मनीष पांडे या त्रिकुटावर अवलंबून आहे. विजय शंकरने राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी केली होती, पण पंजाबविरुद्ध तो पुन्हा अपयशी ठरला. दिल्लीकडे कॅगिसो रबाडा व इनरिच नॉर्जे या वेगवान जोडगोळीसह रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल असे प्रतिभावान फिरकीपटू आहेत. त्यामुळे हैदराबादच्या फलंदाजीचा कस लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या