IPL 2020 – सलग दुसऱ्या पराभवासह सीएसकेने नोंदवला लाजिरवाणा विक्रम

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा मोसम यूएईमध्ये सुरू झाला आहे. मात्र यंदा चेन्नई सुपर किंग्जचा संघ सुरुवातीच्या लढतीत आपल्या क्षमतेनुसार खेळ दाखवण्यास अयशस्वी राहिला आहे. पहिल्या लढतीत मुंबईवर विजय मिळवल्यानंतर धोनीच्या संघाला सलग दोन पराभव सहन करावे लागले. शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेला सामना चेन्नईच्या संघाने 44 धावांनी गमावला आणि लाजिरवाणा विक्रम नावावर जमा झाला.

तीन वेळची विजेता असणारी चेन्नईची टीम दिल्लीच्या संघाने दिलेले 176 धावांचे आव्हान पेलू शकली नाही. चेन्नईचा संघ 131 धावा करू शकला. एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. यामुळे चेन्नईची टीम 44 धावांनी पराभूत झाली. या पराभवासह आयपीएलमध्ये धोनीच्या संघाचा धावांच्या हिशोबाने चौथा मोठा पराभव झाला आहे.

IPL 2020 – मैदानात येताना ‘ग्लुकोज’ चढवून या, दिग्गज खेळाडूने उडवली धोनीसेनेची खिल्ली

याआधी चेन्नईच्या संघाला 2013 मध्ये मुंबईच्या संघाने 60 धावांनी पराभूत केले होते. चेन्नईच्या संघाचा आयपीएलमधील धावांच्या अंतराने सर्वात मोठा पराभव आहे. यानंतर गेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सनेच चेन्नईला पुन्हा 46 धावांनी पराभूत केले होते. तर 2014 ला किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने धोनीच्या संघावर 44 धावांनी विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा दिल्लीने चेन्नईवर 44 धावांनी विजय मिळवला.

एक विजय, दोन पराभव
आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नईसुपर किंग्जची कामगिरी यथा-तथाच आहे. पहिल्या लढतीत मुंबईवर 5 विकेटने विजय मिळवल्यावर दुसऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स संघाकडून 16 धावांनी पराभव सहन करावा लागला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 44 धावांनी हा संघ पराभूत झाला.

आपली प्रतिक्रिया द्या