IPL 2020 – फलंदाजांसाठी धोक्याची घंटा! दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरकडून टीका

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चांगली कामगिरी करणाऱया दिल्ली कॅपिटल्सला मंगळवारी झालेल्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून हार सहन करावी लागली. पराभवाचा धक्का बसल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, शिखर धवन वगळता आमच्या फलंदाजांना अपयशाचा सामना करावा लागलाय. ही धोक्याची घंटा आहे. आगामी लढतींमध्ये सर्वांनी जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा.

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत पराभवाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे हा पराभव धक्कादायक ठरलाय. यापुढे आणखी आव्हानात्मक लढतींना सामोरे जावे लागणार आहे. आम्ही पहिल्या टप्प्यात अप्रतिम क्रिकेट खेळले आहे, पण आता हा इतिहास झालाय. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एका लढतीत विजयाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनीच खेळ उंचावण्याची गरज आहे, असेही तो स्पष्टपणे म्हणाला.

शमी या स्पर्धेतील सर्वोत्तम यॉर्कर टाकणारा गोलंदाज – मॅक्सवेल

किंग्ज इलेव्हन पंजाबने मागील तीन लढतींमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या तीन मोठय़ा व फॉर्ममध्ये असलेल्या संघांना धूळ चारलीय. निर्णायक टप्प्यावर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ फॉर्ममध्ये आलाय. यावर अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आनंद व्यक्त केला. यावेळी त्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. तो म्हणाला, दबावाखाली मोहम्मद शमीने जबरदस्त कामगिरी केलीय. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत सुपरओव्हरमध्येही त्याने छान गोलंदाजी केली. या स्पर्धेतील यॉर्कर टाकणारा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून मी त्याचीच निवड करीन.

मालवणी तडका (दिल्ली-पंजाब लढत)

दिल्लीवाल्यांचे 165 पायली कुळीथ पंजाबने सहज उपडी केले… दिल्लीचे 200 होवचे थय फक्त 164… तेतूर एकटय़ा गब्बरचे 106 नि बाकी सगळ्यांचे मिळान 58… बादल चौधरीच्या शब्दांत – ‘येक मासो, बाकी खंडीभर रसो…’

आपली प्रतिक्रिया द्या