IPL 2020 दुखापतींमुळे दिल्लीची चिंता वाढलीय, चेन्नईशी आज लढत

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. सहा विजयांसह या संघाने 12 गुणांची कमाईही केलीय. पण याच मोसमात या संघासोबत एक वाईट गोष्टही घडतेय. टप्प्याटप्प्याने दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू जखमी होताहेत. इशांत शर्मा, अमित मिश्रा हे अनुभवी गोलंदाज दुखापतींमुळे स्पर्धेबाहेर गेले असून यष्टिरक्षक रिषभ पंतही काही दिवसांसाठी संघाबाहेर आले. यामध्ये भरीसभर म्हणजे या मोसमात शानदार फलंदाजी करीत असलेला श्रेयस अय्यर यालाही गेल्या लढतीत दुखापत झाली. याच पार्श्वभूमीवर दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जचा सामना करणार आहे. एकीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ सातव्या विजयासह प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल तर दुसरीकडे चौथा विजय मिळवून यंदाच्या मोसमातील आपले आव्हान कायम राखण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जचा संघ जिवाचे रान करील.

रबाडा अॅण्ड कंपनी कात टाकतेय
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी विभाग प्रत्येक लढतींत आपला ठसा उमटवतोय. कॅगिसो रबाडा व अॅनरीक नॉर्खिया हे दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवण्यात यशस्वी होताहेत. तसेच रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल हे अनुभवी गोलंदाज फिरकीची धुरा व्यवस्थित सांभाळत आहेत. मराठमोळ्या तुषार देशपांडे याने पहिल्याच लढतीत धमक दाखवून दिलीय. आता त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

पृथ्वी, शिखरवरील जबाबदारी वाढलीय
रिषभ पंत व श्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीमुळे आता शिखर धवन व पृथ्वी शॉ या सलामीवीरांच्या खांद्यावरील जबाबदारी आणखी वाढलीय. या दोघांनाही संयम व आक्रमण याची योग्य सांगड घालून खेळ करावा लागणार आहे. मार्क्स स्टोयनीस याची अष्टपैलू खेळीही यावेळी निर्णायक ठरणार आहे.

राजस्थानला विजयाची नितांत गरज
स्टीवन स्मिथचा राजस्थान रॉयल्सचा संघ व विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यांच्यामध्ये उद्या आयपीएलमधील अन्य लढत रंगणार आहे. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच विजयांसह आपली वाटचाल सुरू ठेवलीय. पण राजस्थान रॉयल्सचे पाच पराभवांमुळे टेन्शन वाढलेय. त्यामुळे उद्याच्या लढतीत त्यांना विजयाची नितांत गरज आहे. या लढतीत जय मिळाल्यास त्यांना आठ गुणांची कमाई करता येणार आहे.

खेळपट्टीचा फायदा धोनीची सेना घेणार…
यूएईतील तीन स्टेडियममध्ये आयपीएलच्या सर्व लढती होत आहेत. त्यामुळे या तीन स्टेडियममधील खेळपट्टय़ांचा वारंवार वापर करण्यात येत असल्यामुळे येथे आता आगामी लढतींमध्ये फिरकीपटूंचा बोलबाला असणार हे निश्चित झाले आहे. याचा फायदा चेन्नई सुपरकिंग्जचा संघ घेण्याच्या प्रयत्नात आहे. मागील लढतीत याचा प्रत्यय आला. पीयूष चावला, कर्ण शर्मा व रवींद्र जाडेजा तीन फिरकी गोलंदाजांना खेळवून महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जने सनरायझर्स हैदराबादला हरवण्याची करामत करून दाखवली. आता आगामी लढतींमध्ये याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. तसेच इम्रान ताहीर या लेगस्पिनरलाही संधी मिळण्याची शक्यता यावेळी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या