मुंबई अजिंक्य, दिल्लीला 5 विकेट्सने मात देत IPL 2020 वर उमटवली मोहोर

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात रंगला. दिल्लीने निर्धारित 20 षटकात 7 बाद 156 धावा केल्या. मुंबईने 157 धावांचे आव्हान 18.3 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात लीलया पार केले आणि पाचव्यांदा चषक उंचावला.

मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा याने मॅचविनिंग खेळी केली. त्याने 50 चेंडूत 68 धावा केल्या. रोहित व्यतिरिक्त ईशान किशनने नाबाद 33, सूर्यकुमार यादवने 19, आणि क्विंटन डिकॉकने 20 धावांचे योगदान दिले.

विजेतेपदाचा ‘पंच’

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 च्या सीझनमध्ये बाजी मारली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकीय खेळी केली. पंत याने 38 चेंडूत 56 धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील पंतचे हे पहिले अर्धशतक आहे. पंतशिवाय कर्णधार श्रेयस अय्यर याने 50 चेंडूत नाबाद 65 धावा केल्या.

खराब सुरुवात

फायनलमध्ये दिल्लीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर स्टोयनिस शून्यावर बाद झाला. यानंतर राहणे 2 आणि शिखर धवन 15 धावा काढून बाद झाला. चौथ्या षटकात दिल्लीची अवस्था 3 बाद 22 धावा अशी झाली होती.

पंत-अय्यरने डाव सावरला

तीन विकेट्स झटपट बाद झाल्यानंतर पंत आणि अय्यरने दिल्लीचा डाव सावरला. दोघात 96 धावांची भागीदारी झाली. 15 व्या षटकात हार्दिक पांड्याकडे झेल देऊन पंत बाद झाला.

बोल्टचे 3 बळी

अंतिम सामन्यात ट्रेंट बोल्ट याने घातक गोलंदाजी केली. बोल्टने 4 षटकात 30 धावा देत 3 बळी घेतले. याव्यतिरिक्त नाथन कुलटर-नाईलने 2 आणि जयंत यादवने 1 बळी घेतला. बुमराहची झोळी मात्र रिकामी राहिली.

आपली प्रतिक्रिया द्या