पंजाब-हैदराबादमध्ये झुंज! दोन्ही संघ पाचव्या विजयासाठी सज्ज

आयपीएलच्या साखळी फेरीची रंगत आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. दिल्ली पॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या तीन संघांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने कूच केलेय, पण चौथ्या स्थानासाठी कमालीची चुरस दिसून येत आहे.

कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये चढाओढ लागलीय. राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांनाही ‘जर-तर’च्या समीकरणावर प्ले ऑफचे तिकीट मिळण्याची आशा आहे. याच पार्श्वभूमीवर दुबईमध्ये उद्या किंग्ज इलेव्हन पंजाब व सनरायझर्स हैदराबाद भिडणार आहेत. दोन्ही संघांना यावेळी पाचव्या विजयाची आस आहे. याचसोबत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकायचे आहे. बघूया, उद्या कोणता संघ बाजी मारतोय ते…

जेसन होल्डरकडून पुन्हा आशा

केन विल्यमसन या स्टार फलंदाजाला दुखापत झाली आणि त्यामुळे मागील लढतीत त्याच्याऐवजी अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला सनरायझर्स हैदराबादच्या संघात स्थान देण्यात आले.

जेसन होल्डरने खेळत असलेल्या आयपीएलच्या पहिल्याच लढतीत आपला ठसा उमटवला. त्याने 33 धावांच्या मोबदल्यात राजस्थान रॉयल्सचे तीन फलंदाज बाद केले. त्यामुळे उद्या त्याच्याकडून पुन्हा एकदा आशा बाळगल्या जातील यात शंका नाही.

अव्वल संघांना हरवत केले कम बॅक

किंग्ज इलेव्हन पंजाबने मागील तीन लढतींत अव्वल संघांना हरवून आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आव्हान कायम ठेवले आहे. दिल्ली पॅपिटल्स, मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांना पराभूत केल्यानंतर आता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडला असेल.

लोकेश राहुलचा हा संघ आता मागे वळून बघणार नाही. त्यामुळे उद्या दोन संघांमध्ये विजयासाठी कमालीचा संघर्ष पाहायला मिळेल.

दिल्लीचे लक्ष प्ले ऑफकडे; कोलकात्याला हवाय विजय

दिल्ली पॅपिटल्स व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये उद्या अन्य लढत खेळवण्यात येणार आहे. यावेळी दिल्ली पॅपिटल्सचा संघ आठव्या विजयाला गवसणी घालून प्ले ऑफमधील स्थान पक्के करण्यासाठी क्रिकेटच्या रणांगणात उतरेल.

कोलकाता नाइट रायडर्सचा संघ सहाव्या विजयासाठी जिवाचे रान करील. त्यांच्या दृष्टीनेही प्ले ऑफसाठी ही लढत महत्त्वाची आहे, पण त्यांच्यासमोर दिल्ली पॅपिटल्सचे तगडे आव्हान आहे.

मनीष पांडे, विजय शंकर आले धावून

सनरायझर्स हैदराबादने गुरुवारी रात्री झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सला पराभूत करीत आयपीएलमधील आव्हान कायम ठेवले. या लढतीत मनीष पांडे व विजय शंकर यांनी अनुक्रमे नाबाद 83 धावा व नाबाद 52 धावा फटकावत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

सनरायझर्स हैदराबादसाठी ही महत्त्वाची बाब ठरली. कारण याआधी कर्णधार डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन व राशीद खान या परदेशी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला विजय मिळवता आले होते.

आजच्या लढती

कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली पॅपिटल्स
झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी
दुपारी 3.30 वाजता

किंग्ज इलेव्हन पंजाब – सनरायझर्स हैदराबाद
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई
रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या