IPL 2020 – चुरस अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी, पंजाब-कोलकाता आमने-सामने

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील प्ले ऑफच्या दृष्टिकोनातून उद्या महत्त्वाची लढत रंगणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब व कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये सोमवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सामना होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने 11 सामन्यांमध्ये 5 विजय मिळवून प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

कोलकाता नाइट रायडर्सने 11 सामन्यांमध्ये 6 विजय मिळवून 12 गुणांची कमाई केलीय. दोन्ही संघांना उद्याच्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. यावेळी अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळेल यात शंका नाही.

हिंदुस्थानी, वेस्ट इंडियन फलंदाज चमकताहेत

किंग्ज इलेव्हन पंजाबचे प्रतिनिधित्व करताना कर्णधार लोकेश राहुल (567 धावा), मयांक अग्रवाल (398 धावा), निकोलस पूरण (327 धावा), ख्रिस गेल (126 धावा) या फलंदाजांनी शानदार कामगिरी केलीय. या हिंदुस्थानी व वेस्ट इंडीजच्या खेळाडूंच्या कामगिरीवर या संघाला आगामी लढतींमध्येही आशा आहेत.

अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला फलंदाजीत अद्याप सूर गवसलेला नाहीए. मात्र महत्त्वाच्या लढतींमध्ये त्याच्याकडून छान फलंदाजी झाल्यास संघासाठी हे हितकारक ठरेल यात शंका नाही

शमी, बिश्नोई, अर्शदीप, जॉर्डनवर मदार

किंग्ज इलेव्हन पंजाबने मागील चार लढतींमध्ये दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांना हरवत या मोसमात झोकात पुनरागमन केले. त्यामुळे या संघाच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही पल्लवित झाल्यात. गेल्या चार सामन्यांमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मिळवलेल्या यशामध्ये गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीचाही सिंहाचा वाटा आहे.

मोहम्मद शमी (17 बळी), रवी बिश्नोई (10 बळी), अर्शदीप सिंग (9 बळी), मुरूगन अश्विन (8 बळी), ख्रिस जॉर्डन (5 बळी) या गोलंदाजांनी किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी उल्लेखनीय कामगिरी केलीय. आता उर्वरीत लढतींमध्ये या गोलंदाजांच्या कामगिरीवरच किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची मदार असेल.

संघ आला फॉर्ममध्ये

कोलकाता नाइट रायडर्सने शनिवारी झालेल्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा उडवला. या लढतीत सर्व बाबी मनासारख्या घडल्या. नितीश राणा व सुनील नारायण यांची फटकेबाजी त्यानंतर कॅट कमिन्स व वरुण चक्रवर्ती यांची प्रभावी गोलंदाजी झाल्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सला दिमाखदार विजय मिळवता आला आणि प्ले ऑफच्या आशा कायम राहिल्या. आता उद्या होणाऱया लढतीत ओएन मॉर्गन अॅण्ड कंपनीला याच कामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा असेलच.

  • आजची लढत – कोलकाता नाइट रायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह, रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या