IPL 2020 – के.एल. राहुलची कमाल, कोहलीच्या ‘विराट’ विक्रमाची केली बरोबरी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलची बॅट खोऱ्याने धावा ओढतेय. प्रत्येक लढतीत राहुल धावांची लयलूट करत आहे. ऑरेंज कॅप देखील सध्या राहुलच्या डोक्यावर आहे.

शुक्रवारी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना रंगला. राजस्थान रॉयल्सने 7 विकेट्सने बाजी मारली. मात्र या लढतीत पंजाबचा कर्णधार के. एल. राहुलने 46 धावांची खेळी करत आयपीएल 2020 मधील 600 धावांचा टप्पा पार केला.

विराटच्या विक्रमाची बरोबरी

राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएल इतिहासात 600 धावांचा टप्पा ओलांडण्याची कामगिरी राहुल दुसऱ्यांदा केली आहे. याआधी राहुलने आयपीएल 2018 मध्ये 659 धावा चोपल्या होत्या.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली याने 2013 आणि 2016 ला अशी कामगिरी केली आहे. 2013 ला त्याने 634 धावा आणि 2016 ला विक्रमी 973 धावा केल्या होत्या.

आयपीएल 2020 मधील कामगिरी

दरम्यान, के. एल. राहुल कर्णधार म्हणूनच नाही तर विकेटकीपर म्हणूनही चांगली कामगिरी करत आहे. विकेटकीपर म्हणून आयपीएल कारकिर्दीत त्याने 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत आयपीएल 2020 मध्ये त्याने 1 शतक आणि 5 अर्धशतक ठोकले आहेत. नाबाद 132 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

आपली प्रतिक्रिया द्या