IPL 2020 – कोलकाता-बंगळुरू आमने-सामने

आयपीएल आता साखळी फेरीच्या अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ प्ले ऑफच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जिवाचे रान करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या अबुधाबी येथे कोलकाता नाईट रायडर्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये महत्त्वाची लढत रंगणार आहे. गेल्या लढतीत ए बी डिव्हिलीयर्सच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा धुव्वा उडवला होता. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी ओएन मॉर्गनचा कोलकाता नाईट रायडर्स संघ सज्ज झाला असेलच.

हवाय सहावा विजय

कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत झालेल्या नऊ लढतींपैकी पाचमध्ये विजय मिळवून दहा गुणांची कमाई केलीय. चार लढतींमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. आता उद्या या स्पर्धेतील सहाव्या विजयाला गवसणी घालण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने कंबर कसली असेल.

फर्ग्युसनमुळे आत्मविश्वास वाढलाय

वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने पहिल्याच लढतीत जबरदस्त कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याने पाच फलंदाज बाद करीत कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे संघातील इतर खेळाडूंमध्येही आत्मविश्वास निर्माण झालाय. पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी यांच्याकडूनही गोलंदाजी विभागात चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कुलदीप यादव, सुनील नारायण या फिरकी गोलंदाजांवरही या संघाची मदार असेल.

प्ले ऑफ दिशेने पाऊल

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने गेल्या आठवडय़ात चांगली कामगिरी केलीय. याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी हा संघ रेडी झालाय. आतापर्यंत झालेल्या नऊ लढतींपैकी सहामध्ये विजय मिळवत या संघाने प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकले आहे. आता उद्या सातवा विजय मिळवण्यासाठी हा संघ प्रयत्नांची शिकस्त करील.

एबीडी, विराट, पडीक्कल, फिंच ही चौकडी ठरणार निर्णायक

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी कर्णधार विराट कोहली, स्टार फलंदाज ए बी डिव्हिलीयर्स, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज अॅरोन फिंच व युवा खेळाडू देवदत्त पडीक्कल या चौघांनी चांगली फलंदाजी केलीय. या चौघांच्या कामगिरीवरच या संघाचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून असेल. ख्रिस मॉरीस, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल, इसिरू उडाना यांच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार असणार आहे.

  • आजची लढत – कोलकाता नाईट रायडर्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी रात्री 7.30 वाजता )
आपली प्रतिक्रिया द्या