IPL 2020 – मयांकने मुरलीचा विक्रम मोडला, संजू सॅमसनने अनोखे ‘शतक’ ठोकले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये रविवारी झालेल्या ‘सुपर संडे’ लढतीत शारजहामध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने दिलेले 223 धावांचे विशाल आव्हान राजस्थान रॉयल्सने पार केले आणि इतिहास रचला. राजस्थानच्या संघाने 19.3 षटकात 6 गडी गमावून 226 धावा चोपल्या आणि आयपीएल इतिहासातील सर्वात ‘रॉयल’ विजय मिळवला. यादरम्यान अनेक विक्रमाची नोंद झाली. पंजाबच सलामीवीर मयांक अग्रवाल याने 50 चेंडूत 106 धावांची तुफानी खेळी करत मुरली विजय याचा विक्रम मोडला.

आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा मयांक अग्रवाल हिंदुस्थानचा दुसरा खेळाडू ठरला आहे. युसूफ पठाण याच्यानंतर आता मयांकच्या नावाची नोंद झाली आहे. मयांकने 45 चेंडूत शतक केले. मुरली विजय याने 2010 साली 46 चेंडूत शतक ठोकले होते. हा विक्रम मयांकने मोडला. तसेच आयपीएलमधील आपल्या वैयक्तिक सर्वोच्च धावांची नोंदही त्याने केली.

Photo – आयपीएलमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 फलंदाज

दुसरीकडे राजस्थान रॉयल्सला विजयाची वाट दाखवणाऱ्या संजू सॅमसन याने 42 चेंडूत चार चौकार आणि 7 षटकार ठोकत 85 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान संजूने अनोखे शतक साजरे केले. संजू याने या लढतीत दुसरा षटकार ठोकताच आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 100 षटकारांची नोंद झाली. आयपीएल इतिहासात 100 षटकार ठोकणारा तो 19 वा खेळाडू ठरला, तर अशी कामगिरी करणारा 11 वा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.

IPL 2020 – शारजहामध्ये 449 धावांचा पाऊस, सॅमसन-तेवतियाच्या ‘त्सुनामी’ने पंजाबचे वादळ थोपवले

आयपीएलमध्ये एक हिंदुस्थानी खेळाडू म्हणून धोनीने सर्वाधिक 212 षटकार ठोकले आहेत. तर एकूण यादीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेल याच्या नावावर आहे. त्याने 326 षटकार ठोकले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या