IPL 2020 – …म्हणून बुमराहने पुन्हा गोलंदाजी केली नाही, जाणून घ्या ‘सुपर ओव्हर’चे नियम

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेसाठी रविवार 18 ऑक्टोबरचा दिवस ऐतिहासिक असाच राहिला. या दिवशी झालेले दोन्ही सामने टाय झाले आणि सुपर ओव्हरने याचा निकाल लागला. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैद्राबाद (SRH) संघात झाला. यात केकेआरने बाजी मारली. सायंकाळी दुबईच्या मैदानावर आणखी एक उत्कंठावर्धक सामना रंगला तो मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात. या लढतीत दोन सुपर ओव्हर पाहायला मिळाल्या. मात्र अखेरच्या क्षणी पंजाबने बाजी मारत सामना आपल्या नावे केला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना डीकॉक, पोलार्ड यांच्या दमदार खेळाच्या बळावर 176 धावा उभारल्या. यानंतर पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल 77 धावांची खेळी करत संघाला विजयासमीप आणले. मात्र अखेरच्या षटकात 9 धावा हव्या असताना पंजाबचा संघ 8 धावा करू शकला आणि सामना टाय झाला. लढतीचा निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये पंजाबकडून के.एल. राहुल आणि निकोलस पूरन मैदानात उतरले, तर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू ‘यॉर्कर किंग’ बुमराहच्या हाती दिला. बुमराहने यात फक्त 5 धावा देत राहुल आणि पूरनला बाद केले. मुंबई आरामात सामना जिंकणार असे वाटत असताना मोहम्मद शमीने टिच्चून गोलंदाजी केली आणि 5 धावा दिल्याने सुपर ओव्हर देखील टाय झाली. त्यामुळे पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात आली.

IPL 2020 – महिला की पुरुष? तुमचाही झाला ना गैरसमज; जाणून घ्या कोण आहेत हे पंच

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबई कडून हार्दिक पांड्या आणि किरोन पोलार्ड मैदानात उतरले. तर पंजाबने जॉर्डनच्या हाती चेंडू दिला. त्याने सुपर ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या आणि हार्दिक पांड्याला बाद केले. 12 धावांचे आव्हान स्वीकारत ‘सिक्सर किंग’ ख्रिस गेल आणि मयांक अग्रवाल मैदानात उतरले. गेलने 1 षटकार आणि मयांकने 2 चौकार ठोकत पंजाबला थरारक विजय मिळवून दिला. मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून बुमराह आणि पंजाबकडून शमीने गोलंदाजी, तर डी कॉक, राहुल आणि निकोलस पूरन फलंदाजी का केली नाही? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र यासाठी आयसीसीचा नियम जाणून घ्यावा लागेल.

– नियम 21 नुसार जर कोणताही फलंदाज पहिल्या सुपर ओव्हरमध्ये बाद झाला असेल तर तो दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करू शकत नाही.

– नियम 22 नुसार पहिल्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केलेला गोलंदाज दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करू शकत नाही.

याचाच अर्थ पहिल्या सुपर ओव्हरमध्ये के.एल. राहुल, निकोलस पूरन आणि मुंबईचा क्विंटन डी कॉक बाद झाले होते. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये त्यांना फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नाबाद राहिलेला पोलार्ड मात्र दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी येऊ शकला. तसेच पहिल्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईकडून बुमराह, तर पंजाबकडून शमीने गोलंदाजी केल्याने, दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये त्यांना पुन्हा गोलंदाजी करता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या