IPL 2020 मुंबई इंडियन्सचे टार्गेट प्ले ऑफ, चेन्नईशी आज भिडणार

रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा संघ आज आयपीएलमधील लढतीत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्जला भिडणार आहे. याप्रसंगी गतविजेत्या मुंबई इंडियन्सने नऊ लढतींमधून सहा विजयांसह 12 गुणांची कमाई केलीय. आता सर्वाधिक चार वेळा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ उद्याच्या लढतीत विजय मिळवून प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. तीन वेळा जेतेपद पटकावणाऱया चेन्नई सुपरकिंग्जला मात्र उर्वरित लढतींमध्ये प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे.

पराभवाचा वचपा काढणार

मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यामध्ये यंदाच्या मोसमातील सलामीची लढत रंगली. या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जने विजय मिळवला. फाफ डय़ुप्लेसिस व अंबाती रायुडू यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपरकिंग्जने बाजी मारली. आता या पराभवाचा वचपा काढण्यासाठी रोहितची सेना सज्ज झाली असेलच.

फलंदाजी शानदार फॉर्ममध्ये

मुंबई इंडियन्सचे सर्व खेळाडू शानदार खेळ करताहेत. कर्णधार रोहित शर्मा, क्विंटॉन डी का@क, सूर्यपुमार यादव, कायरॉन पोलार्ड, इशान किशन यांनी फलंदाजीत चमक दाखवलीय. हार्दिक पांडय़ा व पृणाल पांडय़ा यांनी मोठी खेळी करता आली नसली तरी महत्त्वाच्या खेळी करण्यात दोघांनीही यश मिळवले आहे. या सर्व खेळाडूंकडून आता उर्वरित लढतींमध्ये याच कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षा असेल.

बुमराह ठरतोय प्रभावी

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनीही या मोसमात चांगली कामगिरी केलीय. पण जसप्रीत बुमराहने प्रतिमेला साजेशी कामगिरी करीत प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवलेय. जेम्स पट्टीनसन, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर यांनीही त्याला उत्तम साथ दिलीय. त्यामुळे उद्याची लढत चेन्नई सुपरकिंग्जसाठी आव्हानात्मक असेल यात वाद नाही.

बेंचवरील खेळाडूंना संधी मिळणार?

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला या मोसमात धमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत बेंचवरील खेळाडूंना संधी देण्यात येतेय का हे पाहणे रंजक ठरणार आहे. इम्रान ताहीर, नारायण जगदीशन, मिचेल सँटनर, ऋतुराज गायकवाड, साई किशोर यांना उर्वरित लढतींमध्ये चान्स मिळाल्यास आश्चर्य वाटणार नाही.

आजची लढत
चेन्नई सुपरकिंग्ज वि. मुंबई इंडियन्स
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
रात्री 7.30 वाजता

आपली प्रतिक्रिया द्या