IPL 2020 – हिंदुस्थानचे गोलंदाजीतील ‘शिलेदार’

मुंबई इंडियन्स – किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यामध्ये रविवारी आयपीएलमधील लढत रंगली. या दोन संघांमध्ये निर्धारित वेळेसह पहिल्या सुपर ओव्हरमध्येही बरोबरी झाली. त्यामुळे ही लढत निकालासाठी दुसऱया सुपर ओव्हरपर्यंत पोहोचली. किंग्ज इलेव्हन पंजाबने यामध्ये बाजी मारली. याप्रसंगी सुपर ओव्हरमध्ये दबावाखाली गोलंदाजी करताना आपला ठसा उमटवणाऱया दोन हिंदुस्थानी गोलंदाजांनी साऱयांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह व किंग्ज इलेव्हन पंजाबचा मोहम्मद शमी या दोघांच्या कामगिरीचे चोहोबाजूंनी कौतुक करण्यात आले.

मुंबईचा प्रमुख गोलंदाज – पोलार्ड

दोन वर्षांपूर्वी लसिथ मलिंगा आमचा प्रमुख गोलंदाज होता. पण आता जसप्रीत बुमराहने त्याची जागा घेतली आहे. हा वर्ल्ड क्लास गोलंदाज आहे. क्रिकेटच्या दोन प्रकारांत अव्वल स्थानावर राहण्याची या गोलंदाजाची क्षमता आहे, अशा शब्दांत कायरॉन पोलार्ड याने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले.

सामन्यागणिक सुधारणा – राहुल

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल यानेही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीची स्तुती केली. यावेळी तो म्हणाला, मोहम्मद शमी सुपर ओव्हरमध्ये सहाही चेंडू यॉर्कर टाकण्यासाठीच सज्ज होता. हा अनुभवी गोलंदाज सामन्यागणिक सुधारणा करीत आहे. संघातील सीनियर खेळाडू सामना जिंकून देतात तेव्हा आनंद होतो, असेही तो म्हणाला.

यॉर्कर हेच प्रभावी शस्त्र

निर्धारित टी-20 लढतीत बरोबरी झाल्यानंतर सुपर ओव्हरच्या खेळाला सुरुवात झाली. जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी हे षटक टाकले. लोकेश राहुल, निकोलस पूरण हे स्टार खेळाडू किंग्स इलेव्हन पंजाबसाठी किल्ला लढवत होते. या षटकातील सर्व चेंडू यॉर्कर टाकण्याकडे जसप्रीत बुमराहचा कल होता. अर्थात काही चेंडू फुलटॉस गेले. पण तरीही या षटकात फक्त पाच धावा काढल्या गेल्या. शिवाय दोन फलंदाज बाद करण्यातही जसप्रीत बुमराहला यश लाभले. त्याआधी निर्धारित टी-20मध्ये जसप्रीत बुमराहने लोकेश राहुलला अफलातून यॉर्करवर त्रिफळाचीत केल्यामुळे मुंबई इंडियन्सला ही लढत बरोबरीत ठेवता आली होती. यानंतर मोहम्मद शमीसमोर सहा धावा रोखण्याचे कठीण आव्हान होते. रोहित शर्मा व क्विण्टॉन डी कॉक या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना या अनुभवी गोलंदाजाने रोखले ते प्रभावी यॉर्करच्या सहाय्याने. दोन्ही गोलंदाजांनी यॉर्कर हे शस्त्र वापरून आपआपल्या संघासाठी मोलाची कामगिरी बजावली.

मालवणी तडका (मुंबई – पंजाब लढत)

पयल्या 20 ओवरीत दोघांचेय 176… पयल्या सुपर ओवरीत दोघांचेय 5/5… दुसऱया सुपर ओवरीत पंजाब कधी मॅच घेवन गेली कळलाच नाय…’
बादल चौधरीच्या शब्दांत – ‘काय नाय कळाक, बोको गेलो म्हाळाक…’

आपली प्रतिक्रिया द्या