IPL 2020 – राजस्थानला कर्णधार स्मिथचा ‘मीम्स’ शेअर करणे पडले महागात, स्पष्टीकरण देताना नाकीनऊ

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा संघ किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत तळाला आहे. राजस्थानला प्ले ऑफचे तिकीट मिळवायचे असल्यास पुढील प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव्ह स्मिथच्या हाती कमान असणाऱ्या राजस्थानच्या कामगिरी यथातथाच राहिली आहे. अशातच राजस्थान रॉयल्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक मीम्स शेअर केल्याने गोंधळ उडाला. या मीममुळे स्मिथच्या हातून कर्णधारपद काढून इंग्लंडचा खेळाडू आणि यष्टीरक्षक जोस बटलर यांच्याकडे सोपविण्यात येणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र हा फक्त एक मीम होता असे स्पष्टीकरण देतादेता राजस्थानच्या नाकीनऊ आले आहेत.

राजस्थानच्या संघाने ट्विटरवर प्रसिध्द टीव्ही शो ‘द ऑफिस’ च्या आधारावर एक मीम्स शेअर केला होता. यात जोस बटलर दिसत असून ‘आम्ही जोस बटलर सारखा बॉस मिळाला म्हणून आभारी आहेत’, असे कॅप्शन देण्यात आले होते. यामुळे सोशल मीडियावर स्टीव्ह स्मिथकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले अशी चर्चा सुरू झाली. नेमके याच दिवशी दिनेश कार्तिकने केकेआरचे कर्णधारपद सोडून मार्गनला कर्णधार केल्याने लोकांनी याचा संदर्भ देत राजस्थानच्या संघाने देखील असे केले असावे अशी चर्चा सुरू झाली. लोक याबाबत ट्विट देखील करू लागली.

सोशल मीडियावर बटलर राजस्थानचा नवा कर्णधार अशा ‘अफवा’ पसरू लागल्यावर राजस्थानच्या संघाने याबाबत स्पष्टीकरण दिले. हा एक फक्त मजेशीर मीम्स होता आणि कर्णधार बदलण्याचा कोणताही इरादा नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच स्मिथकडेच नेतृत्व असणार आहे, असेही राजस्थानने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या