IPL 2020 – सातवा पराभव कोणाचा?

आयपीएलमधील परतीच्या साखळी फेरीचा टप्पा सुरू आहे. याप्रसंगी प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. दुबई येथील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये उद्या सनरायझर्स हैदराबाद व राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये लढत रंगणार आहे. दोन्ही संघांना प्ले ऑफच्या रेसमध्ये कायम राहण्यासाठी विजयाची नितांत गरज आहे. दोन्ही संघांना प्रत्येकी सहा लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. यावेळी सातवा पराभव टाळण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नांची शिकस्त करतील. राजस्थान रॉयल्सचा संघ पाचव्या विजयासाठी तर सनरायझर्स हैदराबादचा संघ चौथ्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावेल.

आर्चर, तेवतीयाचे आव्हान

सनरायझर्स हैदराबादसमोर उद्या राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. पण प्रत्यक्षात राजस्थान रॉयल्स या संघापेक्षा राहुल तेवतीया व जोफ्रा आर्चर या दोन फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना त्यांना कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. राहुल तेवतीया याने फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केलीय. तसेच जोफ्रा आर्चरच्या प्रभावी गोलंदाजीपुढे प्रतिस्पर्धी
संघांतील फलंदाजांनी गुडघे टेकलेत. त्यामुळे डेव्हिड वॉर्नर ऍण्ड कंपनीला या खेळाडूंना रोखावे लागणार आहे.

संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय

राजस्थान रॉयल्सने मागील लढतीत चेन्नई सुपरकिंग्जजला पराभूत करीत महत्त्वाचे दोन गुण मिळवले. पण या लढतीत जोस बटलर (नाबाद 70 धावा) व कर्णधार स्टीवन स्मिथ (नाबाद 26 धावा) या दोघांव्यतिरिक्त इतर फलंदाजांना ठसा उमटवता आला नाही. बेन स्टोक्स (19 धावा), संजू सॅमसन (0), रॉबिन उथप्पा (4 धावा) यांच्याकडून निराशा झाली. बेन स्टोक्स अष्टपैलू खेळाडू असून तो काही दिवसांपूर्वीच युएईत दाखल झालाय. त्यामुळे भविष्यातील लढतींमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगू शकतो. पण रॉबिन उथप्पा व संजू सॅमसन यांचा सुमार फॉर्म चिंतेचा विषय आहे. दोघांनाही लवकरात लवकर फॉर्ममध्ये येण्याची गरज आहे.

सांघिक कामगिरीची गरज

सनरायझर्स हैदराबाद संघाला उर्वरित लढतींमध्ये सांघिक कामगिरीची गरज आहे. अन्यथा प्ले ऑफच्या रेसमध्ये हा संघ बाहेर फेकला जाईल. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, राशीद खान या परदेशी खेळाडूंवर अवलंबून राहता हिंदुस्थानी खेळाडूंनीही आपली जबाबदारी ओळखून खेळ करायला हवा. विजय शंकर, मनीष पांडे, संदीप शर्मा, बासील थम्पी, टी. नटराजन यांनी धमक दाखवण्याची गरज आहे.

  • आजची लढत – राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद ( दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, दुबई रात्री 7.30 वाजता )
आपली प्रतिक्रिया द्या