IPL 2020 – डिव्हीलिअर्सची ‘रॉयल’ खेळी, राजस्थानचा 7 गडी राखून पराभव

शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव केला. विजयासाठी 178 धावांचा पाठलाग करताना बंगळुरू कडून विस्फोटक एबी. डिव्हीलिअर्सने तुफानी अर्धशतक झळकावून 2 चेंडू बाकी असताना संघाला विजय मिळवून दिला. डिव्हीलिअर्सने 22 चेंडूत 6 षटकार ठोकत नाबाद 55 धावांची खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर 20 षटकात 6 बाद 177 धावा केल्या. स्मिथला रॉबिन उथप्पाने 41 धावा काढून चांगली साथ दिली. बंगळुरू कडून मॉरिसने 4 आणि चहलने 2 बळी घेतले.

विजयासाठी 178 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळुरूला फिंच आणि पडीकलने 23 धावांची सलामी दिली. फिंच 14 धावांवर बाद झाला. यानंतर पडीकल आणि कर्णधार विराटने बंगळुरूचा डाव 100 पार नेला. मात्र पडीकल 35 आणि विराट 43 धावांवर एकामागोमाग एक बाद झाल्याने बंगळुरूचा डाव संकटात सापडला. मात्र डिव्हीलिअर्सने तुफानी खेळी करत एकहाती सामना जिंकून दिला.

आपली प्रतिक्रिया द्या