मैदानावरील तुफानामुळे राजकारणात रंगले वाकयुद्ध, सॅमसमवरून गंभीर-थरूरमध्ये जुंपली

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा हंगाम यूएईमध्ये सुरू आहे. पहिल्याच आठवड्यात शतक, सुपर ओव्हरचा थरार, अविश्वसनिय फिल्डिंग आणि धावांचा जबरदस्त पाठलाग असे सर्व काही पाहायला मिळाले. रविवारी तर आयपीएल इतिहासातील अविस्मरणीय सामना रंगला. मात्र या लढतीत संजू सॅमसन (Sanju Samson) याने केलेल्या झंझावाती खेळीमुळे राजकारणात टीम इंडियाचा माजी खेळाडू व भाजप खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि काँग्रेस नेते शशि थरूर (Shashi Tharoor) यांच्यात ट्विटरवर वाकयुद्ध रंगले आहे.

रविवारी पंजाबच्या संघाने विजयासाठी दिलेल्या 224 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संजू सॅमसन याने 4 चौकार आणि 7 षटकारांची आतिषबाजी करत 85 धावा केल्या. या खेळीमुळे मन जिंकलेल्या संजूबाबत शशी थरूर यांनी ट्विट केले आणि त्याला टीम इंडियाचा भविष्यातील धोनी असे संबोधले. थरूर यांची ही तुलना न आवडलेल्या गंभीरने यावर पलटवार करत त्यांना उत्तर दिले.

थरूर यांचे ट्विट
‘राजस्थान रॉयल्स संघाने शानदार विजय मिळवला. मी संजू सॅमसन याला जवळपास एका दशकापासून ओळखतो आणि तो 14 वर्षांचा होता तेव्हाच मी हा खेळाडू एक दिवस एम.एस. धोनी सारखा बनेल असे म्हटले होते. आज तो दिवस आला असून आयपीएल मधील त्याच्या दोन दमदार खेळीमुळे तो एक वर्ल्ड क्लास खेळाडू असल्याचे सिद्ध होते’, असे ट्विट थरूर यांनी केले.

गंभीरचे उत्तर
थरूर यांनी संजू सॅमस याला भविष्यातला धोनी संबोधल्याने गौतम गंभीरचा पारा चढला. थरूर यांच्या ट्विटला गंभीरने तात्काळ उत्तर दिले. ‘संजू सॅमसन याला भविष्यात कोणत्याही खेळाडू सारखे बनण्याची आवश्यकटा नाही. तो टीम इंडियाचा संजू सॅमसन बनेल’, असे उत्तर गंभीर याने दिले. गंभीरसह वेगवान गोलंदाज श्रीसंथ यानेही थरुर यांना उत्तर दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या