IPL 2020 वेळापत्रक जारी; मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना

1384

इंडियन प्रीमिअर लीग 2020 चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. 13 व्या मोसमातील सलामीचा सामना 29 मार्चला गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएल जेतेपद पटकावले आहे, तर चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर तीन जेतेपदे आहेत. त्यामुळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या दोन बलाढ्य संघांमध्ये चुरस दिसणार आहे. 17 मे रोजी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे. तर अंतिम सामना २४ मे रोजी होण्याची शक्यता आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ सातव्यांदा आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मैदानावर उतरणार आहे. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यासह मुंबई इंडियन्स प्रत्येकी 6 वेळा आयपीएलच्या सलामीचा सामना खेळणाऱ्या संघांत आघाडीवर होते. पण, आता मुंबई इंडियन्स 29 मार्चला चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकणार आहेत. तर सर्वाधिक अंतिम सामने खेळण्याचा मान महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. चेन्नईने 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, परंतु त्यांना पाचवेळा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. चेन्नईनंतर सर्वाधिक पाच अंतिम सामने खेळण्याचा मान मुंबई इंडियन्सकडे जातो. मुंबईने त्यापैकी चारवेळा जेतेपद पटकावले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या