IPL 2020 – पहिल्या शतकासह धवन विक्रमाच्या शिखरावर, विराट कोहलीचा अनोखा रेकॉर्ड मोडला

शनिवारी शारजाहच्या मैदानावर झालेल्या रोमहर्षक लढतीत दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्ज संघावर अखेरच्या षटकात थरारक विजय मिळवला. अखेरच्या षटकात 17 धावांची आवश्यकता असताना अक्षर पटेलने जडेजाला तीन षटकार खेचत दिल्लीला 5 विकेट्सने विजय मिळवून दिला. दिल्लीचा अनुभवी फलंदाज शिखर धवन याने दणदणीत शतक ठोकले. त्याने 58 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी.

आयपीएल कारकिर्दीतील धवनचे हे पहिलेच शतक आहे. पहिले शतक ठोकण्यासाठी धवनला 167 डाव खेळावे लागले. यासह त्याच्या नावावर 39 अर्धशतकांची नोंद आहे. याबाबतीत तो हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

विराटचा अनोखा विक्रम मोडला
दरम्यान, शिखर धवन याने आपल्या पहिल्या शतकी खेळीसह एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये सर्वाधिक डावानंतर शतक ठोकण्याचा विक्रम धवनने केला. पहिले शतक ठोकण्यासाठी धवनने 167 डाव घेतले. याआधी हा अनोखा विक्रम विराट कोहली याच्या नावावर होता, त्याने 120 डावानंतर शतक ठोकले होते. तर आयपीएलमध्ये पहिल्या शतकासाठी अंबाती रायडू याने 119 डाव आणि सुरेश रैना याने 88 डाव घेतले होते.

चेन्नईचा सहावा पराभव
चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 179 धावा केल्या होत्या. फाफ डु प्लेसिसने 58 आणि अंबाती रायडूने 45 धावांची खेळी केली. मात्र चेन्नईने विजयासाठी दिलेले हे आव्हान दिल्लीने 5 विकेट्सच्या बळावर पूर्ण केले आणि गुणतालिकेत नंबर एक स्थान पटकावले.

आपली प्रतिक्रिया द्या