IPL 2021 बंगळुरुच्या ‘या’ खेळाडूचा लहानपणी झाला होता हत्येचा प्रयत्न, वडिलांनी केला खुलासा

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) स्पर्धेला उद्या 9 एप्रिलपासून होणार आहे. चेन्नईमध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना रंगणार आहे. पहिली लढत खेळणाऱ्या आरसीबीच्या संघातील अष्टपैलू खेळाडू मोईन अली क्रिकेट व्यतिरिक्त अन्य कारणामुळेच चर्चेत आहे.

बांग्लादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांनी मोईन अली याच्याबाबत वादग्रस्त ट्वीट केले होते. मोईन अली क्रिकेटपटू झाला नसता तर तो सीरियाला जाऊन इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला असता, असे ट्वीट नसरीन यांनी केले होते. या ट्वीटमुळे मोठे वादळ उठले. यानंतर त्यांनी हे ट्वीट डिलिट करत हे ट्वीट व्यंगात्मक होते, अशी सारवासारव देखील केली. मात्र तोपर्यंत खूप उशिर झाला होता आणि इंग्लंडच्या खेळाडूंसह जगभरातील युजर्सने मोईन अलीची पाठराखन करत नसरीन यांच्याबाबत संताप व्यक्त केला. या ट्वीटमुळे मोईन अली चर्चेत आला आणि त्याच्याबाबत लहानपणी झालेली एक घटनाही समोर आली.

मोईन अली याला लहानपणी मारण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत त्याने गार्डियन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये माहिती दिली होती. 13 वर्षाचा असताना एका कारवाल्याने मला उडवण्याचा प्रयत्न केला होता. तो व्यक्ती आशियाई दिसत होता, पण नक्षलवादी दिसत नव्हता. त्याने असे करण्याचा प्रयत्न का केला हे मला कळले नाही, असे मोईन अली याने सांगितले.

याबाबच मोईन अलीचे वडील मुनीर यांनीही माहिती देताना सांगितले की, मोईन शाळेतून येत असताना एक भरधाव कार त्याच्या दिशेने आली. त्या व्यक्तीला आम्ही कधीही पाहिलेलेनव्हते. त्याने काच उघडली आणि शिविगाळ केली. मोईन अलीला धडक दिली, त्यामुळे तो रस्त्याच्या बाजूला जाऊन पडला. वेगवान कार पुढे झाडाला धडकून पलटी झाली. एका दुकानदाराने मला फोन करून याची माहिती दिली. मी तिथे पोहोचलो तेव्हा मोईन जखमी अवस्थेत पडला होता, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, मोईन अली हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू असून त्याने आतापर्यंत 61 कसोटी, 109 एक दिवसीय आणि 34 टी-20 लढतीत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 2831, एक दिवसीयमध्ये 1849 आणि टी-20 मध्ये 392 धावांची नोंद आहे. तसेच गोलंदाजीमध्ये त्याने कसोटीत 189 बळी, एक दिवसीयमध्ये 128 बळी आमि टी-20 मध्ये 72 बळी घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या