विजयी अभियान कायम ठेवण्याचे लक्ष्य, चेन्नई-राजस्थानमध्ये आज लढत

तीन वेळा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपरकिंग्ज व पहिल्या मोसमात विजेतेपद पटकावणारा राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये उद्या आयपीएलमधील लढत रंगणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपरकिंग्जने मागील लढतीत पंजाब किंग्जला सहज हरवले, तर राजस्थान रॉयल्सने अटीतटीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सची झुंज मोडून काढली. आता उभय संघ विजयी अभियान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसतील.

दीपक चहर ऍण्ड कंपनीकडून पुन्हा अपेक्षा

चेन्नई सुपरकिंग्जला सलामीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सकडून हार सहन करावी लागली. या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांना सपाटून मार खावा लागला होता. पण पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्जच्या गोलंदाजांनी झोकात पुनरागमन केले. मध्यमगती गोलंदाज दीपक चहर याने चार फलंदाजांना बाद करून पंजाब किंग्जच्या डावाला खिंडार पाडले. या लढतीत सॅम करण, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जाडेजा, मोईन अली यांनीही अप्रतिम गोलंदाजी केली. शार्दुल ठाकूरला लय मिळाली नाही. पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करताना शानदार गोलंदाजी केलीय. यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता नाहीए. उद्याच्या लढतीत सर्व गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याची अपेक्षा यावेळी चेन्नई सुपरकिंग्जचे व्यवस्थापन करीत असेल.

डय़ुप्लेसिस, रैना, रायुडूवर मदार

चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजीची मदार फाफ डय़ुप्लेसिस, सुरेश रैना व अंबाती रायुडू या स्टार खेळाडूंवर असणार आहे. ऋतुराज गायकवाडलाही आतापर्यंत सूर गवसलेला नाहीए. त्यामुळे त्याच्यासाठी उद्याची लढत अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मोईन अली, सॅम करण, रवींद्र जाडेजा ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर यांच्याकडून गोलंदाजीप्रमाणेच फलंदाजीची अपेक्षा बाळगली जात आहे. महेंद्रसिंग धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतोय. याचा अर्थ याही मोसमात तो स्वतःला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आणणार नाही. इतर खेळाडूंना तो संधी देईल.

मॉरिस, उनाडकट, सकारिया तारणार

राजस्थान रॉयल्सच्या संघात स्टार गोलंदाज नाहीत. पण जयदेव उनाडकट व चेतन सकारिया या गोलंदाजांनी मागील लढतीत चमकदार कामगिरी केलीय. ख्रिस मॉरिसकडे दांडगा अनुभव आहे. मुस्तफिजुर रहमान आपल्या गोलंदाजीतील विविधतेने प्रतिस्पर्ध्यांना बांधून ठेवतोय. रियान पराग व राहुल तेवतिया हे गोलंदाज पाचव्या गोलंदाजाची भूमिका पार पाडत आहेत. बघूया हा गोलंदाजी विभाग चेन्नई सुपरकिंग्जच्या फलंदाजांना रोखतोय का ते…

फलंदाजांना फॉर्ममध्ये येण्याची गरज

पहिल्या लढतीत थोडक्यासाठी विजय हुकलेल्या राजस्थान रॉयल्सने दुसऱया लढतीत डेव्हिड मिलर व ख्रिस मॉरिसच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सवर रोमहर्षक विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सने विजय मिळवला असला तरी त्यांच्यासाठी चिंतेची बाब ठरलीय फलंदाजांचा सुमार फॉर्म. कर्णधार संजू सॅमसनने पहिल्या लढतीत दमदार शतक झळकावले खरे, पण दुसऱया लढतीत तो पटकन बाद झाला. त्याशिवाय जोस बटलर, मनन व्होरा, रियान पराग, राहुल तेवतिया यांच्या बॅटमधूनही अद्याप धावा निघाल्या नाहीत. त्यामुळे उद्याच्या लढतीत राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना आपली जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे.

आजची आयपीएल लढत

चेन्नई सुपरकिंग्ज-राजस्थान रॉयल्स (मुंबई, रात्री 7.30 वाजता)

आपली प्रतिक्रिया द्या