बंगळुरूची ‘रॉयल’ हॅटट्रिक, कोलकात्याचा 38 धावांनी पराभव

आयपीएलच्या इतिहासात एकदाही चॅम्पियन न झालेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदाच्या मोसमात कात टाकतोय. विराट कोहलीच्या ब्रिगेडने रविवारी कोलकाता नाइट रायडर्सला 38 धावांनी धूळ चारली आणि विजयाची ‘रॉयल’ हॅटट्रिक साजरी केली. ग्लेन मॅक्सवेल (78 धावा) व ए.बी. डिव्हिलीयर्स (नाबाद 76 धावा) यांची धडाकेबाज अर्धशतके या विजयाची वैशिष्टय़ ठरली. ए. बी. डिव्हिलीयर्सची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहा गुणांची कमाई करीत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. कोलकाता नाइट रायडर्सला तीन सामन्यांमधून दोनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

धावांचा पाठलाग करताना दमछाक

कोलकाता नाइट रायडर्ससमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान उभे ठाकले होते. कोलकाता नाइट रायडर्सचे फलंदाज धावांच्या ओझ्याखाली कोसळले. नितीश राणा (18 धावा), शुभमन गिल (21 धावा), राहुल त्रिपाठी (25 धावा), ओएन मॉर्गन (29 धावा), शाकीब उल हसन (26 धावा) व आंद्रे रस्सेल (31 धावा) यांनी आपापल्या परीने विजयासाठी प्रयत्न केले. कोलकाता नाइट रायडर्सला 8 बाद 166 धावाच करता आल्या. काईल जेमिसनने 3 व युजवेंद्र चहल व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. पहिल्या डावात क्षेत्ररक्षणात केलेल्या चुका या पराभवाला कारणीभूत ठरल्या. तसेच गोलंदाजी करताना कर्णधार ओएन मॉर्गन याच्या डावपेचांवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले.

86 धावांची दमदार भागीदारी

देवदत्त पडीक्कल व ग्लेन मॅक्सवेल या जोडीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा डाव सावरला. दोघांनी तिसऱया विकेटसाठी 86 धावांची दमदार भागीदारी करताना कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अर्थात यामध्ये ग्लेन मॅक्सवेलचा वाटा अधिक होता. देवदत्त पडीक्कल चाचपडतानाच दिसला. त्याने 28 चेंडूंत 25 धावा केल्या. यामध्ये दोन चौकांराचा समावेश होता. प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर देवदत्त पडीक्कल राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद झाला आणि जोडी तुटली.

राहुलचा अप्रतिम झेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या एकाच षटकात दोन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर राहुल त्रिपाठीने कर्णधार विराट कोहलीचा 5 धावांवर अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर वरुण चक्रवर्तीच्या अफलातून चेंडूवर रजत पटीदारची दांडी गुल झाली. त्याला एक धावच करता आली. यामुळे दुसऱया षटकानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था 2 बाद 9 धावा अशी झाली.

दोघांचा सुपर शो

ग्लेन मॅक्सवेल व ए .बी. डिव्हिलीयर्स या सुपरस्टार खेळाडूंची आक्रमक फटकेबाजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारीही रचली. ग्लेन मॅक्सवेल याने पहिल्या दोन लढतीतींल शानदार फॉर्म याही लढतीत सुरूच ठेवला. त्याने 49 चेंडूंत 3 खणखणीत षटकार व 9 शानदार चौकारांसह 78 धावांची खेळी साकारली. पॅट कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर तो हरभजन सिंगकरवी झेलबाद झाला.

56 धावांची अभेद्य भागीदारी

ए. बी. डिव्हिलीयर्स व काईल जेमिसन या जोडीने 56 धावांची अभेद्य भागीदारी रचली. डिव्हिलीयर्सने अवघ्या 34 चेंडूंत नाबाद 76 धावा फटकावल्या. त्याने आपली खेळी 9 चौकार व 3 षटकारांनी सजवली. काईल जेमिसनने नाबाद 11 धावा करीत डिव्हिलीयर्सला उत्तम साथ दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 4 बाद 204 धावा केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या