फायनलचे तिकीट कोणाला? दिल्ली-कोलकाता संघांमध्ये आज क्वालिफायर-2 लढत

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये उद्या बुधवारी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेची क्वालिफायर-2 लढत रंगणार आहे. यात जो संघ बाजी मारेल तो फायनलसाठी क्वालिफाय होणार असून जेतेपदाच्या लढतीत त्यांना महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे आव्हान असेल. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे दोन्ही संघ कागदावर तोडीस तोड असल्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर कोण सरस ठरणार याबाबतची क्रिकेटशौकिनांमधील उत्सुकता टिपेला पोहोचली आहे.

सलामीच्या जोडय़ा फॉर्मात

कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलच्या यूएईतील टप्प्यात जोरदार पुनरागमन केले. शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर ही त्यांची सलामीची जोडी संघाला जबरदस्त सुरुवात करून देत आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉ व शिखर धवन ही दिल्ली कॅपिटल्सची सलामीची जोडीही फॉर्ममध्ये आहे. दिल्ली कॅपिटल्सला क्वालिफायर-1 मध्ये चेन्नईकडून पराभूत झाल्याने क्वालिफायर-2 खेळावे लागत आहे, तर कोलकाता नाइट रायडर्सने एलिमिनेटर लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव करून क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश केला आहे.

इतिहास कोलकात्याच्या बाजूने

कोलकाता नाइट रायडर्स व दिल्ली कॅपिटल्स यांचा आयपीएलमधील इतिहास हा कोलकात्याच्या बाजूने आहे. आतापर्यंत उभय संघांमध्ये 27 लढती झाल्या असून यात कोलकाता नाइट रायडर्सने 15, तर दिल्ली कॅपिटल्सने 11 लढती जिंकल्या आहेत. दोघांमधील एक लढत टाय झाली होती. त्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली होती. उद्याच्या क्वालिफायर-2 मध्ये दिल्ली कॅपिटल्सला आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी असेल.

सुनील नरिनचा दिवस असल्यास

वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरिन कोलकाता नाइट रायडर्ससाठी बंगळुरूविरुद्ध तारणहार ठरला. त्याने आधी 4 बळी टिपत बंगळुरूच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर मोक्याच्या वेळी 15 चेंडूंत 26 धावांची खेळी करून कोलकाता नाइट रायडर्सच्या विजयाच्या उंबरठय़ावर घेऊन जाण्यात मोलाचे योगदान दिले. त्यामुळे उद्या या अष्टपैलू खेळाडूचा दिवस असल्यास मग दिल्लीचे काही खरे नाही.

तोडीस तोड खेळाडू

दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन्ही संघांकडे तोडीस तोड खेळाडू आहे. साखळी फेरीत सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्स संघाने बाजी मारली होती, मात्र परतीच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारून पराभवाची परतफेड केलेली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघात मार्क्स स्टोइनिस व कोलकाता नाइट रायडर्सच्या संघात आंद्रे रस्सेल या अष्टपैलू खेळाडूंचे पुनरागमन होऊ शकते. दिल्ली कॅपिटल्सकडे पृथ्वी शॉ व शिखर धवन या सलामीच्या जोडीसह मधल्या फळीत श्रेयस अय्यर, कर्णधार रिषभ पंत व शिमरन हेटमायर असे एकापेक्षा एक फलंदाज आहे. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सकडेही शुभमन गिल व व्यंकटेश अय्यर या नव्या दमाच्या सलामीच्या जोडीसह नितीश राणा, राहुल त्रिपाठी, कर्णधार इयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक अशी खोलवर फलंदाजी आहे.

संभाव्य उभय संघ –

कोलकाता नाइट राइडर्स – शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन (कर्णधार), नितीश राणा, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), शाकिब अल हसन, सुनील नरिन, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती, शिवम मावी.

दिल्ली कॅपिटल्स – शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, टॉम करन, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कॅगिसो रबाडा, एन्रिक नॉर्खिया, आवेश खान.

आपली प्रतिक्रिया द्या