IPL2021 आरसीबीला मोठा धक्का, पहिल्या लढतीपूर्वी आणखी एका स्टार खेळाडूला कोरोना

इंडियन प्रीमिअर लीगवरील (आयपीएल 2021) कोरोनाचे सावट कायम आहे. एकामागोमाग एक खेळाडू, स्टाफ आणि मैदानावरील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. यात आता आणखी एका खेळाडूचा समावेश झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याला कोरोनाची लागण झाली आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीच्या संघासाठी हा मोठा धक्का आहे. आरसीबीला आपला पहिला सामना 9 एप्रिलला मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळायचा आहे. तत्पूर्वी आरसीबीच्या दोन खेळाडूंना कोरोना झाला आहे. याआधी आरसीबीचा डावखुरा खेळाडू देवदत्त पडीकल यालाही कोरोनाची लागण झाली होती.

rcb-daniel-sams

दरम्यान, डॅनियल सॅम्स (Daniel Sams) याची 3 एप्रिलला कोरोना चाचणी करण्यात आली होती. पहिल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र दुसऱ्या चाचणीमध्ये तो पॉझिटिव्ह आढळला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने स्वत:ला आयसोलेट केले असून आरसीबीने देखील याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

देवदत्त पडीकलही पॉझिटिव्ह

याआधी आरसीबीचा सलामीवीर खेळाडू देवदत्त पडीकल याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. योग्य उपचारानंतर तो बराही झाला आहे, मात्र अद्याप त्याला आरसीबीच्या संघासोबत सराव करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याच्या प्रकृतीवर सध्या डॉक्टरांचे पथक लक्ष ठेऊन असून तो सध्या बंगळुरुतील आपल्या घरीच आयसोलेट आहे.

कोरोनाचे सावट

आयपीएलवर कोरोनाचे सावट कायम असून कालच ब्रॉडकास्ट टीमचे 14 सदस्य, दोन ग्राउंडसमॅन आणि एक प्लंबर कोरोना पॉझिटिव्ह आला होता. तसेच कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू नितिश राणा आणि दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू अक्षय पटेल यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. यातील नितिश राणा बरा झाला असून संघासोबत त्याने सरावही सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या