ठरलं तर! ‘या’ तारखेपासून सुरू होणार IPL 2021, दिल्ली-मुंबईसह 6 शहरात रंगणार सामने

इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2021) च्या 14 व्या मोसमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून 30 मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे. यंदा आयपीएल 2021 चा मोसम 51 दिवस रंगणार असून हिंदुस्थानमध्येच सर्व लढती होणार आहेत, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया‘ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. याबाबत बीसीसीआयने अधिकृत घोषणा केलेली नाही.

गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा 13 वा मोसम सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने व लसीकरणालाही सुरुवात झाल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम घरच्या मैदानावरच होईल. सहा शहरांमध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू येथील मैदानावर जगातील सर्वाधिक लोकप्रीय लीगचे सामने रंगतील.

दुबईमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 मोसमात 60 सामने खेळले गेले होते. शारजाह, दुबई आणि अबुधाबीमध्ये हे सामने रंगले होते. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती.

चेन्नईत मिनी लिलाव

दरम्यान, चेन्नईमध्ये गेल्या महिन्यात आयपीएल 2021 साठी मिनी लिलाव पार पडला होता. दक्षिण आफ्रिकेच्या या अष्टपैलू खेळाडूला राजस्थान रॉयल्स संघाने तब्बल 16 कोटी 25 लाख मोजून आपल्या संघात घेतले होते. तेव्हापासून वेळापत्रकाबाबत चर्चा सुरू झाली होती. आता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की ग्रुप स्टेजचे सर्व सामने मुंबईत आणि नॉकआऊटचे सामने अहमदाबादमध्ये होतील.

दिल्ली कॅपिटल्सच्या सह-मालकाने दिली हिंट

दिल्ली कॅपिटल्स संघाचे सह-मालक पार्थ जिंदल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फो वाहिनीशी बोलताना एक हिंट दिली होती. यंदा आयपीएलचे आयोजन दोन शहरांमध्ये केले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले होते. यातील एक शहर मुंबई आहे, कारण मुंबईत तीन मैदान आहेत. तसेच सरावासाठी मोठी जागा आणि अन्य सोयीसुविधाही आहेत. तर दुसरे शहर अहमदाबाद असून येथे नुकतेच नरेंद्र मोदी मैदानाचे उद्घाटन करण्यात आले असून याची प्रेक्षक क्षमता 1 लाखांहून अधिक आहे. अर्थात त्यांनी यास दुजोरा दिला नव्हता. तसेच देशातील अनेक शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने रंगायला हवे आणि जगाला आपण ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या आयोजनासाठी तयार असल्याचा संदेश द्यायला हवे, असेही ते म्हणाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या