IPL schedule 2021 क्रिकेटरसिकांना मेजवानी, 2 वर्षानंतर पुन्हा हिंदुस्थानमध्ये रंगणार आयपीएलचा थरार

कोरोना महामारीमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेच्या प्रत्यक्ष थराराला देशातील क्रिकेटशौकीन दोन वर्षे मुकले होते. पण यंदा मात्र क्रिकेटशौकिनांना प्रत्यक्ष स्टेडिअमवर जाऊन आयपीएल क्रिकेट लढती याची देही याची डोळा पुन्हा पाहता येणार आहेत.

हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या मायदेशातील आयपीएल लढतींचा कार्यक्रम आज घोषित केला. त्यानुसार 9 एप्रिल 2021 रोजी चेन्नईतील सलामीच्या लढतीने सुरु होणारा आयपीएल हंगाम 30 मे 2021 ला अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणाऱ्या जेतेपदाच्या अंतिम लढतीने संपन्न होणार आहे. कोरोना प्रतिबंधाचे सर्व उपाय अंमलात आणून यंदाचे आयपीएल मायदेशी खेळवले जाणार आहे.

यंदाची सलामीची आयपीएल लढत चेन्नईत विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर बंगुळुरु या संघांत 9 एप्रिलला रंगणार आहे. अहमदाबादचे नव्याने उभारण्यात आलेले मोटेरा स्टेडियम प्रथमच आयपीएल लढतींचे यजमानपद भूषवणार आहे.

यंदाच्या आयपीएल लढती मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बंगुळुरु, कोलकाता आणि दिल्ली या नेहमीच्या केंद्रांवर रंगतील अशी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी केली आहे. मात्र यंदा कोरोना प्रतिबंधांमुळे प्राथमिक फेरीतील लढती या प्रेक्षकांविना खेळवल्या जातील. मात्र बाद फेरीपासूनच्या आयपीएल लढतींना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकेल असे शहा यांनी सांगितले. मात्र या लीगमध्ये खेळणाऱ्या संघातील खेळाडूंच्या आरोग्याची आणि सुरक्षेची काळजी काटेकोरपणे घेण्याचे धोरण बीसीआयने आखले आहे.

असा असेल यंदा आयपीएलचा कार्यक्रम

– 9 एप्रिलला सलामीची आयपीएल लढत चेन्नईत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगुळुरु संघांत
– 56 साखळी लढतींच्या कार्यक्रमात प्रत्येक संघाला ४ स्थळांवर जाऊन खेळावे लागणार
– मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगुळुरु ही शहरे प्रत्येकी 10 लढतींचे यजमानपद भूषवणार
– दिल्ली आणि अहमदाबादला प्रत्येकी 8 लढती मिळणार
– दुपारच्या लढती दुपारी 3.30 वाजल्यापासून तर सायंकाळच्या लढती सायं 7.30 पासून सुरु होणार
– यंदाच्या आयपीएलमध्ये संघांना आपल्या होम ग्राउंडवर एकही लढत खेळता येणार नाही
– प्रत्येक सहभागी संघाला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 3 वेळाच लढतींसाठी प्रवास करावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या