भाजप कार्यकर्त्यामुळे झाला चेन्नई सुपरकिंग्जचा विजय, के.अन्नामलाईंचा दावा

चेन्नई सुपरकिंग्ज संघाने (CSK) IPL 2023 गुजरात टायटन्सवर मात करत चषक उंचावला. गमावलेला सामना आपल्या बाजूला झुकवून तो जिंकून देण्यात अष्टपैलू रवींद्र जाडेजा याने महत्त्वाची भूमिका निभावली होती. या कामगिरीमुळे जाडेजाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. तमिळनाडू भाजप अध्यक्ष के.अन्नामलाई यांनीही जाडेजाच्या कामगिरीचं कौतुक करत चेन्नईच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देत असताना त्यांनी म्हटले आहे की, रवींद्र जाडेजा हा भाजपचा कार्यक्रता आहे आणि त्याच्यामुळेच चेन्नईच्या संघाला विजय झाला.

अन्नामलाई यांचे हे ट्विट तमिळ भाषेत असून त्यांनी यात म्हटले आहे की, “क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा हा भाजप कार्यकर्ता असून त्याची बायको पत्नी रिवाबा या जामनगर नॉर्थ मतदारसंघाच्या भाजप आमदार आहेत. जाडेजा गुजराती असून त्याच भाजप कार्यकर्त्या जाडेजाने सीएसकेला हा विजय मिळवून दिला.”

अन्नामलाई यांनी एका वाहिनीशी बोलताना म्हटले की, एका भाजप कार्यकर्त्याने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वातील संघासाठी विजयी धावा केल्या. जाडेजा भाजप कार्यकर्ता असून ते गुजरातचे आहेत. 29 मे रोजी आयपीएलचा अंतिम सामना झाला ज्यात चेन्नईच्या संघाला शेवटच्या 2 चेंडूत विजयासाठी 10 धावांची गरज होती. जाडेजाने एक षटकार आणि एक चौकार खेचत सामना चेन्नईच्या संघाला जिंकून दिला होता.