
रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडीयमवर आयपीएलचा अंतिम सामना होणार होता. मात्र पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे सोमवारी संध्याकाळी हा सामना होणार आहे. मात्र हवामान खात्याने सोमवारी संध्याकाळी देखील अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता आयपीएलचा अंतिम सामना होणार की नाही अशी चर्चा रंगली आहे.
रविवारी चेन्नई-सुपर किंग आणि गुजरात टायटन यांच्यातील आयपीएलचा अंतिम सामना पाहाण्यासाठी रविवार सकाळपासून क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, संध्याकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने यात विघ्न आणले. संततधार सुरू झालेला पाऊस सुरूच राहिला. मात्र, पाऊस थांबेल आणि सामना सुरू होईल, या आशेवर रसिकांनी भर पावसात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेवटपर्यंत ठाण मांडले होते. मात्र, शेवटी रात्री 11 च्या सुमाराला अंतिम सामना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.
या संघाला मिळू शकते विजेतेपद
सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार असल्याचे समजते. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता. त्यांची गुणसंख्या जास्त असल्याने गुजरातला विजेता घोषीत करण्यात येईल असे बोलले जात आहे.