IPL 2023 पुन्हा लास्ट ओव्हर थ्रिलर; गुजरातची यशस्वी पाठलागाची हॅटट्रिक

पुन्हा एकदा आयपीएल सामन्यात शेवटच्या षटकांतला थरार अनुभवायला मिळाला. गुजरातला विजयासाठी शेवटच्या 2 चेंडूंत 4 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने खणखणीत चौकार ठोकत पंजाबचा एक चेंडू आणि 6 विकेटनी विजय मिळविला. तसेच गुजरातने सलग सहाव्यांदा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला.

सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धिमान साहा यांनी 48 धावांची खणखणीत सलामी दिली. पंजाबने दिलेले 154 धावांचे माफक आव्हान गुजरात सहज बाजी मारेल, असे वाटत होते. मैदानात शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर हे दिग्गज उभे होते. तरीही सलग पाचव्या दिवशी सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. तेव्हा सॅम करनने भन्नाट सुरुवात केली. सॅमला षटकार खेचत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रयत्नात शुभमन गिल त्रिफळाचीत झाला आणि गुजरातला जबर धक्का बसला. पुढे सॅमने अचूक गोलंदाजी करीत सामना पाचव्या चेंडूंपर्यंत नेला. पण राहुल तेवतियाने स्कूप शॉट मारत गुजरातच्या यशस्वी पाठलागाची मालिका कायम ठेवली. गुजरातने चारपैकी  तिन्ही सामने धावांचा पाठलाग करत जिंकले. शुभमनने स्पर्धेतील दुसरे अर्धशतक झळकावताना 7 चौकारांसह डावातील एकमेव षटकारही ठोकला.

तत्पूर्वी गुजरात टायटन्सच्या सर्वच गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे पंजाब किंग्जला कशीबशी 20 षटकांत 8 बाद 153 अशी मजल मारता आली. पंजाबच्या फलंदाजांनी आज चक्क 56 चेंडू निर्धाव खेळले. गेल्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झालेला प्रभसिमरन आज दुसर्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. तसेच गेल्या तीन डावात 40, ना. 86 आणि ना.99 धावा करणारा शिखर धवन (8) आज अपयशी ठरला. त्यानंतर मधल्या फळीतील मॅथ्यू शॉर्ट (36), भानुका राजपक्षे (20), जितेश शर्मा (25), सॅम करन (22) आणि शाहरुख खान (22) यांनी छोटया का होईना महत्त्वाच्या खेळ्या करत संघाला दीडशेपलिकडे नेले. आजच्या सामन्यात या डावात पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. तसेच त्यांना एक अर्धशतकी भागीही रचता आली नाही. तळाला येऊन शाहरूखने 9 चेंडूंत 2 षटकार आणि एक चौकार लगावत 22 धावा ठोकल्या. म्हणूनच पंजाब दीडशेपार पोहोचला. गोलंदाजीत मोहित शर्माने 18 धावांत 2 विकेट घेतले.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज 20 षटकांत 8 बाद 153 (मॅथ्यू शॉर्ट 36, भानुका राजपक्षे 20, जितेश शर्मा 25, सॅम करन 22, शाहरुख खान 22 ; मोहित शर्मा 4-0-18-2, राशीद खान 4-0-26-1)

गुजरात टायटन्स 19.5 षटकांत 4 बाद 154 (वृद्धिमान साहा 30, शुभमन 67 ; हरप्रीत ब्रार 4-0-20-1, सॅम करन 3.5-0-25-1)