बीसीसीआयचे लक्ष्य ‘300 कोटी’.आयपीएलसाठी दोन नवे प्रायोजक शोधण्याचा प्रयत्न

326

बीसीसीआयने कोरोनाच्या काळातही आयपीएलचे आयोजन यशस्वी करून दाखवण्यासाठी कंबर कसली आहे. बाजारात मंदी आली असली तरी 19 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱया आयपीएलमधून 300 कोटी कमवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करीत आहे. यंदाच्या आयपीएलसाठी विवोसोबतचा करार मोडल्यानंतर बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

विवोसोबत केलेल्या करारानुसार बीसीसीआयला वर्षाला 440 कोटी रुपये मिळतात. आता कोरोनामुळे बीसीसीआयला इतकी रक्कम मिळणे कठीण दिसतेय, पण आयपीएलसाठी एकूण पाच प्रायोजकांसह 300 कोटी कमवण्यासाठी यावेळी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे एक नव्हे, तर दोन प्रायोजकांचा शोध यावेळी घेतला जाण्याची शक्यता आहे.

विवोसोबतचा करार मोडल्यानंतर बीसीसीआय या वर्षी होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. 440 कोटींऐवजी 300 कोटींची कमाई करता आली, 75 टक्के महसूल तरी मिळवता येईल याकडे बीसीसीआय लक्ष देत आहे. तसेच नवा प्रायोजक हा फक्त चार महिन्यांसाठीच असणार आहे. त्यामुळे आणखी अडचण निर्माण होऊ शकते. तसेच कोरोनाच्या काळात इतक्या रकमेची बोली कोण लावणार? हाही यक्षप्रश्नच आहे. त्यामुळे बीसीसीआयला आगामी आयपीएलसाठी तारेवरची कसरत करावी लागणार यात शंका नाही.

कोण बाजी मारणार?

आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवण्यासाठी मोठय़ा कंपन्यांमध्ये रस्सीखेच लागलीय. यामध्ये बायजू, ऍमेझॉन, ड्रीम इलेव्हन, जिओ या कंपन्यांचा समावेश आहे. पतंजलीनेही यामध्ये उडी मारण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी बीसीसीआयने मात्र मौन बाळगले आहे. या कंपन्यांखेरीज आणखी कोणती मोठी कंपनी आयपीएलचे प्रायोजकत्व मिळवण्यासाठी उत्सुक नाही ना? असा प्रश्न यावेळी निर्माण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या