दिल्लीविरुद्ध पुण्याचे पारडे जड

33

सामना क्रीडा प्रतिनिधी । पुणे

स्टीव्हन स्मिथच्या रायझिंग पुणे सुपरजायंट संघाने आयपीएलच्या दहाव्या सत्रात झालेल्या दोन लढतींत एक विजय व एक पराभव पाहिला. दुसरीकडे झहीर खानच्या दिल्ली डेअरडेविल्सची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे आज विजयाची बोहणी करण्यासाठी त्यांच्यापुढे यजमान पुणे सुपरजायंट संघाचे आव्हान असेल. कारण या घडीला तरी दिल्लीविरुद्ध नक्कीच पुण्याचे पारडे जड दिसत आहे.
पुणे संघाने सलामीच्या लढतीत मुंबई इंडियन्सवर रोमहर्षक विजय मिळविला होता. मात्र इंदूरमधील दुसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबकडून पुण्याला पराभूत व्हावे लागले. दिल्ली डेअरडेविल्सला सलामीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पराभवाचा धक्का दिला. पुण्याकडे अजिंक्य रहाणे, कर्णधार स्टीव्हन स्मिथ, स्टोक्स, महेंद्रसिंह धोनी, मनोज तिवारी, डॅनियल ख्रिस्टीन अशी खोलवर आणि प्रतिभावान फलंदाजांची फळी आहे. दिल्लीकडे अदित्य तरे, सॅम बिलिग्स, करुण नायर, संजू सॅमसन, ऋषभ पंत, ख्रिस मॉरिस व कार्लोस ब्रॅथवैट अशी फलंदाजी आहे. मात्र यात दहशत असलेला किंवा सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज दिसत नाही. वेगवान गोलंदाजी हाच दिल्लीचा प्लस पॉइंट आहे.

गोलंदाजीबाबत बोलायचे झाल्यास पुण्याची मदार दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहीरवर असेल. साडेचौदा कोटीच्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सकडून अद्याप आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी झालेली नाही. खरंतर तो पुणे संघाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे. याचबरोबर अशोक डिंडा, डॅनियल ख्रिस्टीयन, राहुल चहर व रजत भाटीया हेही गोलंदाज पुण्याच्या दिमतीला असतील. दिल्लीकडे झहीर खान व ख्रिस मॉरिस अशी वेगवान जोडगोळी आहे. शाहबाझ नदीम, अमित मिश्रा या फिरकीवरही दिल्लीचे भवितव्य अवलंबून असेल.

आपली प्रतिक्रिया द्या