
चेन्नई-गुजरातची आज फायनल, वेळः सायंकाळी 7.30
आयपीएलच्या अंतिम सामन्यात पावसाने दमदार बॅटिंग करत आजचा सामना एकहाती जिंकला. चेन्नई-सुपर किंग आणि गुजरात टायटन यांच्यातील आयपीएलचा अंतिम सामना पाहाण्यासाठी आज सकाळपासून क्रिकेट रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, संध्याकाळपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने यात विघ्न आणले. संततधार सुरू झालेला पाऊस सुरूच राहिला. मात्र, पाऊस थांबेल आणि सामना सुरू होईल, या आशेवर रसिकांनी भर पावसात नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये शेवटपर्यंत ठाण मांडले होते. मात्र, शेवटी रात्री 11 च्या सुमाराला अंतिम सामना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली.
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला रविवारी होणार होता. महेंद्र सिंग धोनीची चेन्नई सुपर किंग्स, की हार्दिक पांडय़ाची गुजरात टायटन्स या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं. मात्र, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर फक्त पावसाची धुव्वाधार बॅटिंग बघायला मिळाली. त्यामुळे जेतेपदाचा फैसला राखीव दिवशी म्हणजे सोमवारी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे.
अहमदाबादमध्ये जवळपास चार ते पाच तास जोरदार पाऊस पडला. पंचांनी रात्री 11 वाजेपर्यंत सामना सुरू होण्याची वाट पाहिली. पण पावसाने विश्रांती घेतली नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झालाय. आता राखीव दिवशी, म्हणजेच सोमवारी आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा विजेता मिळणार आहे. पण सोमवारी पावसाने उसंत घेतली नाही, तर गुजरातला जेतेपद देण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर होता.