IPL 2020 – आता पंजाबच्या रडारवर दिल्ली, लोकेश राहुलच्या ब्रिगेडला हवाय चौथा विजय

किंग्ज इलेव्हन पंजाबने रविवारी सुपर ओव्हरमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सला पराभूत करीत आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील आपले आव्हान कायम ठेवले. आता उद्या त्यांच्या रडारवर असणार आहे गुणतालिकेत अव्वल स्थानावर असणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ. लोकेश राहुलची ब्रिगेड श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सला धक्का देऊन आणखी एक रोमहर्षक विजय मिळवतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ मात्र आठव्या विजयासह प्ले ऑफच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी उद्या क्रिकेटच्या रणांगणात लढताना दिसणार आहे.

राहुल, मयांक, गेलवर मदार

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 9 लढतींमध्ये 525 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये एक शतक व पाच अर्धशतकांचा समावेश आहे. मयांक अग्रवालने एक शतक व दोन अर्धशतकांसह 393 धावा फटकावल्या आहेत. या दोघांनी सलामी फलंदाज म्हणून उल्लेखनीय कामगिरी केलीय. अनुभवी ख्रिस गेलला संघात संधी दिल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने दोन्ही लढतींत विजय मिळवलाय. या दोन्ही लढतींत ख्रिस गेल याने महत्त्वाच्या क्षणी धावा केल्या आहेत. त्यामुळे उद्याच्या लढतीत या तिघांच्या फलंदाजीवर या संघाची मदार असणार आहे.

शमी ऍण्ड कंपनीला रोखावे लागणार

किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने या मोसमात 14 फलंदाज बाद केले आहेत. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत या अनुभवी गोलंदाजाने सुपरओव्हरमध्ये जबरदस्त कामगिरी केली हे विशेष. मोहम्मद शमीसह रवी बिश्नोई, मुरूगन अश्विन, अर्शदीप सिंग, ख्रिस जॉर्डन या गोलंदाजांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मार्कस स्टोयनीस या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी या गोलंदाजांवर असणार आहे.

परफेक्ट गोलंदाजी कॉम्बिनेशन

दिल्ली कॅपिटल्स संघाचे गोलंदाजी कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. सात विजयांमध्ये हे प्रकर्षाने दिसूनही आले आहे. कॅगिसो रबाडा (19 बळी) व ऍनरीक नॉर्खिया (12 बळी) हे दक्षिण आफ्रिकन गोलंदाज सातत्याने चांगली कामगिरी करताहेत. रविचंद्रन अश्विन (7 बळी) व अक्षर पटेल (7 बळी) यांनी फिरकी गोलंदाजीची बाजू भक्कमपणे सांभाळलीय. अक्षर पटेल याने अवघ्या 5.59च्या इकॉनॉमीने तर रविचंद्रन अश्विन याने 7.18च्या इकॉनॉमीने धावा दिल्यात ही वाखाणण्याजोगी बाब. युवा मुंबईकर तुषार देशपांडे हाही चांगली कामगिरी करतोय. मार्कस स्टोयनीस हा अष्टपैलू खेळाडू दिमतीला आहेच. एकूणच काय, तर सध्या दिल्ली कॅपिटल्सचे एकंदरीत कॉम्बिनेशन टी-20 क्रिकेट, यूएईतील खेळपट्टी व वातावरणासाठी योग्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

धवनचा फॉर्म महत्त्वाचा

शिखर धवन या अनुभवी डावखुऱया फलंदाजाने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या लढतीत शतक झळकावत आपण फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले. दिल्ली कॅपिटल्ससाठी त्याने आतापर्यंत सर्वाधिक 359 धावा तडकावल्या आहेत. श्रेयस अय्यर (321 धावा) व मार्कस स्टोयनीस (217 धावा) यांच्या बॅटमधूनही धावा निघत आहेत. अजिंक्य रहाणे (25 धावा) व पृथ्वी शॉ (202 धावा) यांना मागील काही लढतींमध्ये सूर गवसला नाहीए.

  • आजची लढत – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स ( दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या