निकोलस पूरणचे अफलातून क्षेत्ररक्षण, चार फूट उंच व सहा फूट दूर झेप घेत चेंडू आत ढकलला

किंग्स इलेव्हन पंजाब व राजस्थान रॉयल्स यांच्यामधील लढतीत षटकार व धावांचे विक्रम नोंदवले गेले. लहान आकाराचे हे स्टेडियम फलंदाजांसाठी पर्वणीच. याचप्रसंगी गोलंदाजांसह क्षेत्ररक्षकाची मात्र येथे दैना उडते. पण रविवारी रात्री झालेल्या या लढतीत एक संस्मरणीय बाब घडली. किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळणारा निकोलस पूरण याने सीमारेषेवर अफलातून फिल्डिंगचा नजराणा पेश करीत जगभरातील तमाम क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याच्या अद्भुत कौशल्यामुळे संजू सॅमसनला सहा धावांऐवजी दोनच धावांवर समाधान मानावे लागले. निकोलस पूरणच्या क्षेत्ररक्षणातील लाजवाब कामगिरीनंतर दिग्गजांकडून त्याचे कौतुक करण्यात आले.

घडले असे…

राजस्थान रॉयल्सचा संघ फलंदाजी करीत होता. किंग्स इलेव्हन पंजाबकडून आठवे षटक मुरूगन अश्विन टाकत होता. संजू सॅमसनने या षटकातील तिसऱया चेंडूवर लेग साइडला चेंडू फिरकवला. हा चेंडू हवेतून थेट सीमारेषा ओलांडणार हे निश्चित होते. याचवेळी निकोलस पूरण नावाचा सुपरमॅन धावून आला. त्याने तब्बल चार फूट उंच व सहा फूट दूर झेप घेत चेंडू पकडला आणि मैदानाखाली पडण्याआधी तो चेंडू पुन्हा आत ढकलला. त्याच्या या भन्नाट कौशल्यामुळे संजू सॅमसन व राजस्थान रॉयल्सला सहा धावांऐवजी फक्त दोनच धावा मिळाल्या.

सचिन, सेहवागकडून कौतुक

वेस्ट इंडीजच्या निकोलस पूरण याने क्षेत्ररक्षणात केलेली जबरदस्त कामगिरी पाहून दिग्गजांकडून त्याचे कौतुक करण्यात आले. भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला, माझ्या कारकीर्दीत आतापर्यंत एकापेक्षा एक अफलातून क्षेत्ररक्षण बघितले आहे. पण निकोलस पूरणने याने केलेले क्षेत्ररक्षण सर्वोत्तम आहे. वीरेंद्र सेहवाग याने स्तुती करताना म्हटले की, ग्रॅव्हीटी नामक चीज भी भूला दी, ऐसा कैसे. ग्रॅव्हीटी को हरा दिया. किंग्स इलेव्हन पंजाबचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक जॉण्टी ऱहोडस यानेही उभे राहून निकोलस पूरणच्या क्षेत्ररक्षणाला सॅल्यूट केला.

आपली प्रतिक्रिया द्या