पुण्याला रोखण्यासाठी कोलकाता सज्ज, पुणेकर शतकवीर बेन स्टोक्सकडे क्रिकेटशौकिनांचे लक्ष

20

सामना ऑनलाईन, कोलकाता

सलग तीन विजयांनंतर सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करणारा कोलकाता नाईट रायटर्स संघ उद्या घरच्या मैदानावर पुण्यावर मात करीत प्ले ऑफचे तिकीट बुक करण्याच्या जबर इराद्याने मैदानात उतरणार आहे. स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील रायझिंग पुणे सुपर जायंटस् संघही ‘प्ले ऑफ’ प्रवेशाच्या निर्धाराने ईडन गार्डनवर झुंजण्यासाठी सज्ज आहे. अष्टपैलू शतकवीर बेन स्टोक्सला फलंदाजीत गवसलेला सूर ही पुण्याची मोठी जमेची बाजू ठरणार आहे. ईडन गार्डनच्या हिरव्यागार मैदानात ‘फॉर्मात’ असलेले गौतम गंभीर व स्टिव्हन स्मिथ या दोन प्रतिभाशाली कर्णधारांची झुंज क्रिकेट शौकिनांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.

गंभीरच्या कोलकाता नाईट रायडर्सने १० व्या आयपीएलमध्ये आतापर्यंत १० लढतींतून ७ विजय मिळवत १४ गुणांसह दुसरे स्थान राखले आहे. उद्या त्यांनी पुण्याविरुद्ध विजय मिळवल्यास ‘प्ले ऑफ’मधील त्यांचे स्थान निश्चित असेल. गेल्या लढतीत डेव्हिड वॉर्नरच्या हैदराबाद संघाने कोलकाता संघाचा विजयी ‘अश्वमेध’ रोखला होता. पुणे संघानेही काल शानदार विजय मिळवत गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. त्यामुळे पुणे संघ कोलकाता संघाला दुसरा झटका देण्याची क्षमता राखून असल्याचे स्पष्ट आहे.

कोल्टर नाइल, उमेश यादव, कुलदीपवर यजमानांची भिस्त
कोलकात्यातील ईडन गार्डनच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज कोल्टर नाइल, उमेश यादव आणि ‘फिरकीवीर’ कुलदीप यादव व सुनील नरीन या गोलंदाजांवर कोलकाता संघाची मोठी भिस्त असेल. पुण्याच्या फलंदाजांना कमीतकमी धावसंख्येवर रोखण्याकडे यजमान कोलकाता संघाचा भर असेल.

आपली प्रतिक्रिया द्या