मुंबई-पुणे सलामीची झुंज ठरणार रोमांचक

35

सामना ऑनलाईन, पुणे

‘स्टार’ क्रिकेटपटूंनी भरलेला रायझिंग पुणे सुपरजायंटस् संघ उद्या पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आपल्या सलामीच्या आयपीएल झुंजीत माजी विजेत्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. यंदाच्या दहाव्या आयपीएल क्रिकेट सपर्धेत स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील पुणे संघाला गत हंगामातील आपले अपयश धुऊन काढायचे आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघही विजयी सुरुवात करून स्पर्धेतील यशस्वी शुभारंभासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे आयपीएल लढत रोमांचक होणार यात शंकाच नाही.

गेल्या नवव्या आयपीएल हंगामात पुणे संघाला घरच्या मैदानावरील सर्व चार लढती गमवाव्या लागल्या होत्या. त्यानंतर मुंबईत पुणे सुपरजायंटस् संघाने मुंबईला हरवले होते. त्यानंतर मात्र संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने स्मिथ आणि कंपनीला स्पर्धेत सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र स्मिथचा पुणे संघ घरच्या मैदानावर विजय मिळवून पुणेकरांना खूश करण्यासाठी सज्ज झाला आहे.

पुणे संघाची फलंदाजी बलवान
पुणे संघाची फलंदाजी अतिशय बलवाण आहे. कारण कर्णधार स्टिव्ह स्मिथसह फाफ डुप्लेसीस, अजिंक्य रहाणे हे स्टार फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. शिवाय महेंद्रसिंग धोनीसारखा जगातला सर्वोत्तम फिनिशर व यंदाच्या आयपीएलमधला सर्वात महागडा अष्टपैलू क्रिकेटर बेन स्टोक्स पुणे संघाच्या दिमतीला आहे. गोलंदाजीतली अनुभवी मिचेल जॉन्सन, अशोक दिंडा, शार्दुल ठाकूर हे वेगवान गोलंदाज तर अष्टपैलू रजत भाटिया हा मध्यमगती गोलंदाज पुणे संघात खेळत आहे. त्यामुळे गोलंदाजीतही पुणे संघ बलवान वाटत आहे.

उद्घाटन सोहळा ठरणार मनोरंजक
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर उद्या रात्री ८ पासून रायझिंग पुणे सुपरजायंटस् व मुंबई इंडियन्स संघातला यंदाचा शुभारंभी सामना खेळवला जाणार आहे. या लढतीआधी होणाऱया उद्घाटन सोहळय़ात बॉलीवूड स्टार व मराठमोळा सिनेस्टार रीतेश देशमुखची अदाकारी हे उपस्थितांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. पुणेकर क्रिकेटशौकिनांसाठी उद्या रीतेशची उपस्थिती व स्टार क्रिकेटपटूंची कामगिरी हा दुग्धशर्करा योगच ठरणार आहे.

मुंबई इंडियन्सची मदार कर्णधार रोहितच्या फॉर्मवर
२०१५ च्या आठव्या आयपीएलमध्ये पहिले पाच सामने गमावल्यानंतर फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेत मुंबई इंडियन्सने जेतेपदाला गवसणी घातली होती. पण गेल्या वर्षी मुंबई संघाला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदाच्या दहाव्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची फलंदाजीची मदार प्रामुख्याने दुखापतीतून सावरलेल्या रोहित शर्माच्या कामगिरीवर असेल. त्याला लेंडल सिमन्स, अंबाती रायुडू, जोस बटलर, कायरॉन पोलार्ड, पार्थिव पटेल या अनुभवी फलंदाजांची साथ लाभल्याने मुंबई तिसऱयांदा आयपीएल जेतेपदाला गवसणी घालू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या