सुपरनोवासचा अखेरच्या चेंडूवर दमदार विजय

70

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई 

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मंगळवारी इतिहास रचला गेला. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच महिलांचा ट्वेण्टी-२० सामना खेळवला गेला. या लढतीत हरमनप्रीत कौरच्या सुपरनोवास संघाने स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझर्स संघावर अखेरच्या चेंडूवर दमदार विजय मिळवला. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या शानदार खेळाने उपस्थित क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले गेले. ट्रेलब्लेझर्सकडून खेळताना ३२ धावा तसेच दोन बळी गारद करणारी सुझी बेटस् हिची वुमन ऑफ दी मॅच म्हणून निवड करण्यात आली.

ट्रेलब्लेझर्सकडून मिळालेल्या १३० धावांचा पाठलाग करणाऱ्या सुपरनोवासने तीन गडी राखून विजय मिळवला. मिताली राजने २२ धावांची, डॅनियल वॅटने २४ धावांची, कर्णधार हरमनप्रीत कौरने २१ धावांची व एलिस पेरीने नाबाद १३ धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला. ट्रेलब्लेझर्सकडून पूनम यादव व सुझी बेटस् यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दरम्यान, याआधी कर्णधार स्मृती मंधाना व एलिसा हिली या दोघींना आपला ठसा उमटवता आला नाही. पण सुझी बेटस् हिने दोन चौकारांसह ३२ धावा करीत आपली चुणूक दाखवली. दीप्ती शर्माने २१ धावांची तर मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्सने २५ धावांची खेळी करीत ट्रेलब्लेझर्ससाठी महत्त्वाची कामगिरी बजावली.

 

आपली प्रतिक्रिया द्या