इशांत, पीटरसन, स्टेनसह अनेक दिग्गज संघातून रिलीज

43

>> नवी दिल्ली, (वृत्तसंस्था)

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा, इंग्लंडचा सदाबहार फलंदाज केविन पीटरसन आणि दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेन यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या आगामी सत्राच्या पार्श्‍वभूमीवर आपापल्या संघमालकांनी रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

आगामी वर्षी ‘आयपीएल’च्या दहाव्या सत्रासाठी सर्व आठ संघांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.
‘आयपीएल’मध्ये जवळपास १४० खेळाडू खेळतात. त्यातील ४४ परदेशी क्रिकेटपटू हे कायम ठेवले असून, ६३ खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. दुखापतीतून सावरलेल्या ईशांत शर्माने प्रदीर्घ काळानंतर इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत ‘टीम इंडिया’च्या कसोटी संघात पुनरागमन केले आहे. गतवर्षीच्या ‘आयपीएल’ लिलावात ‘रायझिंग पुणे सुपरजायंट्स’ संघाने ईशांतला ३.८ कोटी रुपयांना खरेदी केले होते. पुणे संघाला गतवर्षी सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पुणे संघाने ११, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १० तर कोलकाता नाइट रायडर्स संघाने ९ खेळाडूंना रिलीज केले.

गत ‘आयपीएल’मध्ये पुणे संघाने केविन पीटरसनसाठी ३.५ कोटी रुपये मोजले होते. डेल स्टेनला ‘गुजरात लायन्स’ या नव्या संघाने २.३ कोटी रुपयांत खरेदी केले होते. पीटरसनला दुखापतीमुळे मागील सत्रात खेळता आले नव्हते. पुणे संघाने इशांत, पीटरसनसह अष्टपैलू इरफान पठाण व फिरकी गोलंदाज मुरूगन अश्‍विन यांना रिलीज करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली डेअरडेविल्सने अष्टपैलू पवन नेगीसाठी ८.५ कोटी रुपये मोजले होते. या महागड्या खेळाडूलाही दिल्लीने रिलीज केले. कोलकाता नाइट रायडर्सने जेसन होल्डर, कोलिन मुनरो, जॉन हेस्टिंग्स, ब्रॅड हॉग व मोर्नी मोर्केल या परदेशी खेळाडूंना मुक्त केले तर, सनरायझर्स हैदराबादने ट्रेंट बोल्ट, आशीष रेड्डी व इयान मोर्गन यांना संघातून बाहेर केले. याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल जॉनसन (किंग्ज इलेव्हन पंजाब), न्यूझीलंडचा कोरी अ‍ॅण्डरसन व मार्टिन गप्टील (मुंबई इंडियन्स), ऑस्ट्रेलियाचा नाथन कोल्टर नील (दिल्ली डेअरडेविल्स) आणि इंग्लंडचा कर्णधार इयोन मोर्गन (सनरायझर्स हैदराबाद) या खेळाडूंनाही मुक्त करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या