राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, देवेन भारती ‘एटीएस’प्रमुख

256

सामना ऑनलाईन । मुंबई

महाराष्ट्र पोलीस दलात बुधवारी मोठे फेरबदल झाले. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांची गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती करण्यात आली असून गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव सिंघल यांच्याकडे पोलीस मुख्यालयात प्रशासनाची जबाबदारी देण्यात आली आहे तर अपर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सदावर्ते यांची महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याशिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची पोलीस मुख्यालयात प्रशासनपदी, मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी राजवर्धन, वाहतूक शाखेचे सहआयुक्त अमितेश कुमार यांची राज्य गुप्तवार्ता विभागात तर दीपक पांडेय यांची कारागृह विभागात बदली करण्यात आली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरून अपर पोलीस महासंचालकपदी बढती झालेले व नवीन नियुक्ती मिळालेले अधिकारी पुढील प्रमाणे-
मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांची ऍण्टी करप्शन ब्युरोमध्ये बदली करण्यात आली. डॉ. सुखविंदर सिंग यांची अपर पोलीस महासंचालक फोर्स वन, अनुपकुमार सिंह (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी), विनीत अग्रवाल (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), सुनील रामानंद (कारागृह).

विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे
डॉ. प्रताप दिघावकर (महिला अत्याचार प्रतिबंध), मनोज लोहिया (मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन), दत्तात्रय मंडलिक (गुन्हे अन्वेषण विभाग), केशव पाटील (प्रशिक्षण), पी. व्ही. देशपांडे (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी).

पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढती मिळालेले अधिकारी व त्यांच्या नियुक्त्या
नीलेश भरणे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे नागपूर शहर), संजय शिंदे (प्रशासन, पुणे शहर), आर. बी. डहाळे (बिनतारी संदेश यंत्रणा, पुणे), ए. आर. मोराळे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर), निसार तांबोळी (मुख्य दक्षता अधिकारी, सिडको), जालिंदर सुपेकर (आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), डॉ. जय जाधव (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ), एम. भोसले (कारागृह, संभाजीनगर).

देवेन भारती ‘एटीएस’प्रमुख
मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक घोटाळा विभागाचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांची महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष डुंबरे यांना बढती देऊन त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी संतोष रस्तोगी यांची निवड करण्यात आली आहे.

देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आहेत. त्यांनी मुंबई गुन्हे शाखेत पाच वर्षे उत्कृष्ट कामगिरी केली असून अंडरवर्ल्ड व अतिरेकी कारवायांना आळा घालण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीही देवेन भारती यांनी अविरत प्रयत्न केले होते. सतत चार वर्षे मुंबईची कायदा सुव्यवस्था सांभाळणारा हा पहिलाच आयपीएस अधिकारी आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा ‘एटीएस’ला अतिरेकी कारवाया मोडून काढण्यासाठी फायदा होणार असल्यानेच देवेन भारती यांना ‘एटीएस’च्या प्रमुखपदी बढती देऊन नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या