इराणमध्ये 500 हून अधिक लोकांना सजा-ए-मौत; जाणून घ्या काय आहे कारण

महसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाब विरोधी आंदोलनादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे. इराण ह्युमन राईट्सच्या (IHR) अहवालानुसार यंदा इराणमध्ये 500 हून अधिक लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गतवर्षांपेक्षा 2022 मधील मृत्यू दंडाचा आकडा सर्वात जास्त आहे. इराणमधील कट्टरतावादी सरकारने वेगवेगळ्या अपराधांसाठी लोकांना या शिक्षेस पात्र ठरविले आहे. अहवालामधील माहितीनुसार अद्याप काही प्रकरणांची छानबीन केली जात आहे, त्यांचे कारण स्पष्ट झाल्यास मृतांची संख्या कदाचित 500 हून अधिकही असू शकते.

इराण ह्युमन राईट्स (IHR) तर्फे सदर आकडा जारी करण्यात आला आहे. आयएचआरने याविषयी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे की, 2022 सालामध्ये कमीत कमी 504 लोकांना मृत्यूदंडाला सामोरं जावं लागलं आहे. यामधील 4 जणांना गेल्या रविवारीच शिक्षा दिली आहे. या चार व्यक्तिंवर इस्राएलच्या गुप्तचर यंत्रणांसोबत काम करत असल्याच्या संशयावरून शिक्षा दिली गेली.

आयएचआरचे संचालक महमूद अमीरे मोघहद्दम यांनी सांगितले की,  अनेक आरोपींना कोणत्याही न्यायालयीन पडताळणीशिवायच शिक्षा दिली गेली आहे. तसेच त्या व्यक्तिंना आपली बाजू मांडण्यासाठी कोणतीही संधी दिली नाही. महमूद यांच्या मतानुसार लोकांना सजा-ए-मौत देऊन इराण सरकारने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे व आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना इशारा देत लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे.

मोठ्या संख्येने महिलांनाही भयानक शिक्षा झाली

IHR नुसार, ज्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यात अनेक महिलांचा समावेश आहे. गेल्या रविवारीच एका महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. महिलेने सासरच्या मंडळींना मारल्याचा आरोप होता. अहवालानुसार, इराणमध्ये ज्या महिलांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यापैकी बहुतांश महिलांवर अनैतिक संबंधांमुळे आपल्या जोडीदाराची किंवा नातेवाईकांची हत्या केल्याचा आरोप आहे.

‘मॉरल पोलिसिंग’चा निर्णय रद्द

इराणमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिजाबविरोधी आंदोलनाचा विजय झाला आहे. सरकारने आंदोलकांसमोर माघार घेतली असून ‘मॉरल पोलिसिंग’चा निर्णय रद्द करत असल्याची घोषणा अॅटॉर्नी जनरल मोहम्मद जफर मोंताजेरी यांनी केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे कट्टरतावादाचे बळी ठरलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.